कधी कधी आयुष्यात काही प्रसंग अचानकपणे अनुभवायला मिळतात. पण अशा प्रसंगांचा अनुभव समाधान देणारा असला तर.. तर बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. अशाच एका अनुभवाविषयी..

दोन-एक महिन्यांपूर्वी एक फोन आला- ‘हां, नमस्ते निपुणजी!’. बाईंचा आवाज थोडा खरखरीत होता आणि त्या सुरुवातीच्या तीन शब्दांतच एक सच्चेपणा जाणवत होता. ‘तुमचा नंबर मला आशूकडून मिळाला’, त्या पुढे म्हणाल्या. आता मी माझ्या आयुष्यातले सगळे ‘आशू’ आठवायला लागलो! एकतर कोणाच्या नावाचा शेवट उकारार्थी करायची मला बिलकूल सवय नाही. ते फारसं आवडतही नाही. सगळ्या जवळच्या लोकांची नावं एकतर ‘या’ने संपतात, किंवा आडनावाने हाक मारली जाते किंवा सरळसोट त्यांना एक टोपणनाव पडतं, ज्याचा त्यांच्या खऱ्या नावाशी काहीच संबंध नसतो! असो, तर हा ‘आशू’ काही केल्या माझ्या डोळ्यांसमोर येईना. म्हणून त्यांना थांबवत विचारलं की ‘नेमकं कोण?’. तर त्याही थोडय़ा गडबडल्या आणि म्हणाल्या की अहो आशू म्हणजे पुष्कराज. पुष्कराज चिरपुटकर!

माझी एकदम टय़ूब पेटली. पुष्कराजने मला सांगितलं होतं की तुला अनुराधा भोसले या ‘अवनि’ नावाच्या संस्थेच्या संचालकांचा फोन येईल म्हणून. आणि पुष्कराजची एक ओळख ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधल्या ‘आशू’ची आहे हीपण टय़ूब पेटली. पण अनुराधाबाईंनी जितक्या साधेपणाने, थोडं गडबडून पण स्वत:वर हसत हा खुलासा केल्यावर मला त्या फार आवडल्या. त्यांनी मग त्यांच्या त्या रखरखीत पण उबदार आवाजात ‘अवनि’ या संस्थेबद्दल सांगितलं. ‘अवनि’ ही कोल्हापुरात लहान मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. मुख्यत: अशी मुलं जी मूलभूत सोयी-सुविधांना वंचित आहेत. मजुरी करणाऱ्या कामगारांची मुलं, अनाथ मुलं, बालकामगार. या व अशा मुलांना ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ द्यायचा पुरेपूर प्रयत्न करणारी, म्हणून ‘अवनि’. तर त्यांनी या मुलांसाठी एक चित्रपट बनवायची छोटी कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यातून शिकून तिकडच्या मुलांनी दोन लघुपट बनवले होते. त्या लघुपटांचा त्यांना कोल्हापुरात प्रीमियरसारखा सोहळा करायचा होता. त्यासाठी त्यांना पुष्कराजला आणि मला पाहुणे म्हणून बोलवायचं होतं. या अशा प्रकारचं निमंत्रण मला आधी कधीच आलं नव्हतं आणि या मुलांनी केलेले लघुपट पाहण्याचं कुतूहल निर्माण झालं. त्यात कोल्हापूर हे माझं आजोळ असल्याने माझं बरंचसं बालपण तिकडे गेलं होतं, पण आता तिकडे फार जाणं होत नाही. पुन्हा एकदा कोल्हापूरला अनायसे जायला मिळणार होतं आणि तेही एक अभिनव उपक्रमासाठी. त्यामुळे लगेच होकार कळवला! अनुराधाबाईंनी लगेच ‘तुमची मानधनाची काय अपेक्षा आहे?’ असा प्रश्न विचारल्यावर मलाच थोडं ओशाळल्यासारखं झालं. सेवाभावी संस्थांकडे जायला आपण कसले पसे मागायचे? हेच त्यांनाही सांगितलं.

शेवटी एकदाचा २० नोव्हेंबर आला आणि कोल्हापूरकडे रवाना झालो. अनुराधाबाई या अधूनमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्कात होत्या. गंमत म्हणजे आमचा इकडचा संवाद फक्त इंग्रजीतून चालू होता. शेवटी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. काही वेळाने त्या प्रत्यक्षात भेटायला आल्या. आणि अवनि बघायला आम्हाला घेऊन गेल्या. वाटेत आम्ही संस्थेबद्दल, लघुपटांच्या या उपक्रमाबद्दल, त्यांच्या स्वत:बद्दल अजून माहिती घ्यायला सुरुवात केली. इतर मुलांना ही संस्था मदत तर करतेच, पण ४५ मुलांची संपूर्ण जबाबदारी ‘अवनि’ने उचलली आहे. त्यांचं राहणं, खाणं, शिक्षण सगळंच! त्या संस्थेत १३ लोक पूर्णवेळ कार्यरत आहेत आणि या स्वत: त्या ४५ मुलांची ‘आई’ आहेत. अशा या संस्थेमध्ये मुंबईच्या ‘फिल्म बग’ नावाच्या संस्थेने १२ दिवसांची चित्रपटाची विविध अंगे शिकवणारी कार्यशाळा घेतली होती. त्यांचा असा मानस आहे की अशा लहान मुलांना जर ही कला शिकवली आणि त्यांना एखादा लघुपट करायची संधी दिली तर त्यांनासुद्धा वेगळ्या प्रकारे व्यक्त होता येईल. आपली घुसमट, आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायला त्यांनाही एक वेगळं माध्यम मिळेल. लोकांनाही नव्या कथा बघायला मिळतील, नवी मांडणी बघायला मिळेल. हे ऐकल्यावर मी विचार करू लागलो की खरंच हा उपक्रम सतत करून बघायला पाहिजे. आणि अशाही संस्था कार्यरत आहेत आणि त्या ‘अवनि’सारख्या संस्थेबरोबर काम करत आहेत हे ऐकून फार बरं वाटलं. या उपक्रमाअंतर्गत दोन लघुपट बनवले होते – ‘थेंबे थेंबे तळे साचे’ आणि ‘सरळ रेषी’.

कोल्हापूरच्या थोडंसं बाहेर आमची गाडी गेली आणि एका टेकडीवर हळूहळू चढायला लागली आणि शेवटी तिकडे पोहोचली. तिकडे सगळे आमची वाट बघतच होते. काही मुला-मुलींनी थोडे चमकणारे, एकसारखे कपडे घातले होते. आम्ही आल्यावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते लगेच दोन ओळींमध्ये उभे राहिले आणि ‘हम होंगे कामयाब’च्या चालीवर इंग्रजीत एक स्वागतगीत त्यांनी सादर केलं. विशेष म्हणजे, त्या गाण्यातल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ त्या चिल्ल्या-पिल्ल्यांना समजला होता किंवा कोणीतरी त्यांना चांगला समजावला होता हे जाणवलं! नंतर आमचं औपचारिक स्वागत म्हणून आम्हाला एक-एक फूल दिलं. ते पण त्या मुलांनी तिकडे कागदापासून बनवलेलं – इको फ्रेंडली. त्यांचं कार्यालय, मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था असं सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. त्या छोटय़ा जागेचा त्यांनी फार चांगला वापर केला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण परिसर स्वच्छ होता. त्या आम्हाला ती संस्था दाखवता दाखवता जर कुठे कागद पडला असेल किंवा कुठे काही पडलं असेल तर ते त्या त्याक्षणी साफ करून घेत होत्या. त्याचबरोबर ज्यांचं तिकडे काम नव्हतं त्यांना कार्यक्रमाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसायला सांगत होत्या जेणेकरून कार्यक्रम सुरू करायला उशीर होणार नाही.

आम्हीही कार्यक्रमाला जायला निघालो. अनुराधाबाईंशी गप्पा सुरू होत्याच. त्या स्वत:बद्दल थोडं सांगू लागल्या. त्याही एकेकाळी बालकामगार होत्या हे ऐकल्यावर थक्क झालो. एकेकाळी अहमदनगरमध्ये वीटभट्टीवर काम करणारी एक मुलगी तिचं एमएसडब्ल्यू (MSW) संपवून आता एक इतकी चांगली संस्था चालवत आहे, फडा फडा इंग्रजी बोलते आहे, शिकवते आहे, ४५ मुलांची आई होते आहे! ‘जीवनात प्रत्येक टप्प्यावर फक्त संघर्षच पाहिला! मग त्याच्यासमोर आपण खचून जायचं की त्याला सामोरं जायचं हेच दोन मार्ग उरतात’, असं त्या अगदी साधेपणाने, कुठलाही आविर्भाव न ठेवता सांगत होत्या. त्या मुंबईत शिकायला आल्यावर त्यांना कसं इंग्रजी येत नव्हतं म्हणून कॉलेजमधून काढणार होते आणि मग त्यांनी कसं स्वत:ला इंग्रजी शिकवलं हे प्रसंग खरंतर त्यांच्याकडूनच ऐकण्यासारखे आहेत! आता ‘अवनि’च्या निमित्ताने त्या विविध ठिकाणी फिरून इंग्रजीतून भाषण देतात, ‘अवनि’चे प्रोजेक्ट रिपोर्ट स्वत: बनवतात!

आम्ही कार्यक्रमाला पोहोचलो. चित्रपट बघायची उत्सुकता खूप वाढली होती! शेवटी कार्यक्रम सुरू झाला. लघुपटाच्या आधी िहदी सिनेसृष्टीच्या काही लोकांच्या या उपक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया दाखवल्या गेल्या. प्रत्येक जण आवर्जून या मुलांचा ‘अंडर प्रिव्हिलेज्ड’ म्हणून उल्लेख करत होता. ते लघुपट पाहिले. त्यांची कथा काय आहे हे मला इथे सांगायला फार आवडेल, पण ते बरोबर होणार नाही. अनुराधाबाईंशी बोलून ते सगळ्यांना उपलब्ध करून देण्याविषयी विनंती करेन. पण इतकंच सांगेन की कुठलाही आविर्भाव न बाळगता, अत्यंत प्रामाणिकपणे या मुलांनी स्वत:चं जग मांडू पाहिलंय. हे भल्या भल्यांना जमत नाही. ते पाहिल्यानंतर प्रश्न पडला, की खरा ‘अंडर प्रिव्हिलेज्ड’ कोण? ज्याला सुविधा मिळत नाहीत तो की ज्याला मिळूनही जो काहीही करत नाही तो?

निघताना मला इकडे आल्याचं समाधान नक्की वाटलं; पण आपण समाजासाठी नेमकं काय करतोय हाही विचार भेडसवायला लागला. फक्त पसे देऊन भागणार नाहीये. म्हणून निघता निघता अनुराधाबाईंना त्या मुलांचं नाटकाचं शिबीर घ्यायचा प्रस्ताव मांडून आलो. त्यांनीही लगेच होकार दिला. आता पुन्हा कोल्हापूरला जायचे वेध लागले आहेत!

निपुण धर्माधिकारी- response.lokprabha@expressindia.com / @NiDharm
(सौजन्य : लोकप्रभा)