करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक देश शक्य होईल त्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. मात्र या बंदचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. तसंच या बंदच्या काळात मोठमोठ्या कंपन्यांनाही आर्थिक समस्यांना समोरं जावं लागत आहे. यामध्येच डिस्ने या एन्टरटेन्मेंट कंपनीनी एक निर्णय घेतला आहे.

बऱ्याच देशांमध्ये लॉकडाउन केल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचं काम ठप्प झालं आहे. या कंपन्यांमध्ये डिस्ने या कंपनीचादेखील समावेश आहे. त्यामुळे  डिस्नेकडून कंपनीत उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन बॉब आयगर यांनी एक महिन्याचं वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बॉब चॅपक यांना मासिक पगारातील केवळ ५० टक्केच वेतन मिळणार आहे.  बॉब यांनी नुकताच डिस्ने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे

लॉकडाउन असल्यामुळे डिस्नेचे थीम पार्क,प्रोडक्शन आणि थिएटर्स सारं काही बंद आहे. त्यामुळे सध्या कंपनीवर आर्थिक भार आला आहे.त्यामुळे उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘न्युयॉर्क टाइम्स’च्या ब्रूक बॉर्न्स यांनी कंपनीच्या मेलचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान,  करोना विषाणूमुळे सध्या सगळ्याच देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक देश त्यांना शक्य होईल त्या उपाययोजना करत आहे. आतापर्यंत जगात हजारो लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.