|| सुहास जोशी

जग हलवून सोडणाऱ्या घटना वाचणे, पाहणे बहुतांश लोकांना नक्कीच चित्तवेधक असते. पण अशा घटनांची रुपेरी पडद्यावरील मांडणी करताना अनेक पथ्य पाळावी लागतात. किंबहुना एकाच वेळी त्याचे नाटय़ रूपांतरण आणि त्याच वेळी त्या घटनेचे गांभीर्य दोन्ही जपावे लागते. ही एकप्रकारे तारेवरची कसरतच असते. ही कसरत अतिशय कौशल्याने ‘चेर्नोबिल’ या मालिकेत साकारली आहे.

तत्कालीन सोव्हिएत रशियामधील ही घटना. युक्रेनमधील चेर्नोबिल या शहराबाहेर असलेल्या अणुभट्टीत झालेला अपघात आणि त्यानंतर झालेला उत्पात या मालिकेत पकडला आहे. १९८६ सालच्या एप्रिल महिन्यात एका सुरक्षा प्रयोगादरम्यान चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोट होतो. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना या स्फोटाची नेमकी कल्पनाच सुरुवातीला येत नाही. वरिष्ठांच्या धाकामुळे प्रकरण तसेच रेटले जाते. त्यामुळे जवळच्या शहरातदेखील नेमके काय घडले याची जाणीव होत नाही. स्फोटानंतर लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे कर्मचारी गंभीररीत्या जखमी होतात. त्यांना मॉस्कोला हलवले जाते. स्फोट, आग आणि त्यानंतरच्या घटनांचा अहवाल वाचताना मॉस्कोतील बैठकीत वॅलरी लिगासो या अणुशास्त्रज्ञाला या स्फोटाची व्याप्ती लक्षात येते, त्याच्या लक्षात येते की अणुभट्टीच्या गाभ्याचाच स्फोट झाला आहे. त्यानंतर सुरू होते ती प्रत्यक्ष मृत्यूच्या थैमानाला सामोरे जाण्याची आणि ते थैमान थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याच्या प्रयत्नांची जणू काही न संपणारी मालिका.

चेर्नोबिलमध्ये थेट नरसंहार नसला तरी ती जग हादरवून टाकणारी घटना होती. अणुऊर्जेचा पर्याय हा कितपत सुरक्षित आहे यावर सततचे प्रश्न उद्भवत असताना सोव्हिएट रशियात झालेली ही घटना, त्यामुळेच जागतिक पातळीवर खूप महत्त्वाची ठरते. त्यातच तत्कालीन रशियाच्या पोलादी शासन यंत्रणेतून अधिकृत माहिती जगासमोर येईल याची सुतराम शक्यता नसते. मात्र त्याच वेळी किरणोत्साराला ही पोलादी चौकट नसते. त्यामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये चेर्नोबिलचे वास्तव जाणवायला सुरुवात होते. अशा वेळी या स्फोटानंतर नाटय़मय अशा प्रचंड घडामोडी झाल्या. त्या साऱ्या घडामोडी या मालिकेत पकडण्यात मालिकाकर्ते यशस्वी झाले आहेत.  फक्त ही घटनाच केवळ नाटय़मय इतकेच त्याचे वर्णन करणे अन्यायकारक ठरेल. कारण राजकीय, प्रशासकीय पातळीवरील अशा असंख्य गोष्टी घडत असतानाच मृत्यूची ही गडद सावली कशी दूर सारता येईल यासाठी सुरू असलेले प्रयत्नदेखील तितकेच महत्त्वाचे होते. तेथे खरा कस लागत होता. अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. त्यामुळे सगळ्याच बाबतीत प्रयोग करा आणि चाचपून पाहा अशी परिस्थिती होती. हाच भाग मालिकेच्या मध्यवर्ती आहे आणि तो तितक्याच प्रभावीपणे मांडलादेखील आहे. लिगासो या अणुशास्त्रज्ञाला सुरुवातीला खिजगणतीही न धरणारे नोकरशहा आणि राजकीय नेते सरतेशेवटी त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करण्याकरता कसे जिवाचे रान करतात हा बदल खूप प्रभावीपणे टिपला आहे. कारण त्या प्रसंगाला सत्यतेची डुब आहे. त्यामुळेच ही मालिका केवळ तत्कालीन रशियावर दुगाण्या झाडणारी न ठरता लिगासोच्या प्रयत्नांचा दस्तावेज होऊन जाते.

मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे काम नि:संशयपणे भूमिकेला न्याय देणारे आहे. पण त्याचबरोबर संवाद आणि नेपथ्यालादेखील तेवढेच गुण द्यावे लागतील. अणुस्फोटानंतर  किरणोत्साराचे सारे परिणाम मांडताना लिगासो यांची देहबोली, अतिशय धोकादायक अशी कामगिरी बजावण्यासाठी कामगारांना तयार करतानाचे प्रसंग, भुयार खणून संभाव्य आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न, पन्नास लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर असे खूप सारे प्रसंग अतिशय बोलकेपणाने सादर झाले आहेत. मुळात त्यावेळी सारेच अगतिक झालेले असतात, पण काही तरी हालचाल करणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात एक विचित्र द्वंद्व सुरू असते. हे सारे मालिकाकर्त्यांनी अगदी प्रभावी पद्धतीने पडद्यावर उतरवले आहे.

चेर्नोबिलच्या अणुभट्टीतील स्फोट, त्यानंतरचे किरणोत्सर्ग थोपवण्याचे प्रयत्न आणि शेवटी त्याबाबत सुरू असलेला न्यायालयीन खटला अशा तीन टप्प्यांत ही मालिका विभागली आहे. त्या त्या टप्प्यावरील नेमकेपणा पुरेपूर उतरला आहे. प्रत्येक टप्प्यावरील अगतिकता, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्याच वेळी दडपशाहीचा परिणाम हे सारे अगदी सहजपणे मालिकेत टिपता येते. प्रत्यक्षात साकारता न येणारी अशी ही घटना असल्यामुळे त्यात स्पेशल इफेक्ट्सचा वापर नक्कीच झाला आहे हे एकूण ते चित्रीकरण पाहताना वाटते. पण त्यामध्ये कोठेही कृत्रिमता येऊ  न देता ते साधण्याची किमया येथे केली आहे.  सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे अर्थातच यावर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा, टीका होणे साहजिकच आहे. तशी ती येथेदेखील झाली आहेच. पण घेतलेले आक्षेप डॉक्युड्रामावरील टीका म्हणून कमी आणि इतर मुद्दय़ांवर अधिक आहे. अनेकांनी यातील रशियाच्या धोरणाबाबत अतिशोयक्ती जाणवली, तर काहींनी नाटय़मयता वाढवण्यासाठी अशास्त्रीय घटनांचा वापर केला असे वाटले. पण मुळातच हे सारे नाटय़ रूपांतर आहे या मुद्दय़ांकडे न पाहता केलेली टीका वाटते. जग हादरवून टाकणारी ही घटना पडद्यावर साकारताना हे मुद्दे तुलनेने कमी महत्त्वाचे वाटावे असेच आहेत.

हे सर्व पाहताना एक गोष्ट अतिशय तीव्रतेने जाणवते ती म्हणजे या साऱ्या घटना अतिशय संयतपणे मांडल्या आहेत. त्यात मेलोड्रामाचा मोह टाळला आहे. सहज चमकून जाणारा विचार म्हणजे, भोपाळ वायू दुर्घटनेवर जर भारतीय मालिका आलीच, तर ती इतक्या प्रभावीपणे त्या प्रसंगाची तीव्रता मांडेल का? अर्थातच हा जर तरचा मुद्दा झाला. भोपाळ अशा पद्धतीने पडद्यावर येईल तेव्हा येईल, पण चेर्नोबिलमधील मृत्यूची सावली टाळण्याची मांडण्याचा हा प्रयत्न प्रामाणिकपणे झाला आहे हे नक्की.

  • चेर्नोबिल
  • ऑनलाइन अ‍ॅप – हॉटस्टार