बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपट कारकिर्दीच्या चढत्या आलेखात विनोदी चित्रपटांची महत्वाची भूमिका आहे. अक्षयने ‘वेलकम’, ‘हेरा फेरी’ आणि ‘सिंग इज किंग’सारख्या गाजलेल्या विनोदी चित्रपटांमधून अभिनयाचा बाज दर्शविला. असे असले तरी विनोदी अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत म्हणावे तसे मानाचे स्थान मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. मला विनोदी भूमिका साकारायला आवडते. अभिनयातला हा एक कठीण प्रकार आहे. परंतु, विनोदी अभिनेत्यास दुर्देवाने चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा मान मिळत नाही, अशा शब्दांत अक्षयने एका मुलाखतीदरम्यान आपले दु:ख व्यक्त केले. मोठ्या पडद्यावरील त्याच्या उत्कृष्ट विनोदी शैलीची चाहते आणि समीक्षकांनी वाखाणणी केली असली, तरी जोपर्यंत प्रेमपट अथवा भव्यदिव्य चित्रपटातून तुम्ही भूमिका साकारत नाहीत, तोपर्यंत चित्रपटसृष्टी तुम्हाला योग्य तो मान देत नसल्याचे त्याचे मानणे आहे. जोपर्यंत तुम्ही प्रेमपट अथवा ट्रॅजडी प्रकारातील चित्रपटांमधून भूमिका साकारत नाहीत, तोपर्यंत तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारापासून वंचित राहता. लोकांना हसविण्याच्या कलेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसून, हे फार दुर्देवी असल्याचेदेखील तो म्हणाला. पूर्वीच्या काळी अमिताभ बच्चन यांनी ‘देश प्रेम’ चित्रपटात विनोदी भूमिका साकारली होती. त्यांनी चित्रपटांमधून हिरोच्या भूमिकेबरोबरच विनोदी भूमिकादेखील साकारल्या. किशोर कुमार यांचादेखील असाच अभिनयाचा बाज होता. फार कमी कलाकार आहेत ज्यांनी असे काही केले आहे. मी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे, अक्षय कुमार सांगत होता. विनोदी कलाकांरांना सध्या चित्रपट आणि छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात मिळत असलेली संधी पाहून आनंद होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
विनोदी भूमिकांबरोबरच अक्षय कुमार मोठ्या पडद्यावर धाडसी दृश्ये लीलया साकारतो. ‘सिंग इज ब्लिंग’ या त्याच्या आगामी चित्रपटात त्याने खऱ्याखुऱ्या सिंहाबरोबर दृश्य साकारले आहे. चित्रपटात तो सिंहाबरोबर दोन हात करत नसून, वनराज केवळ अक्षयच्या गाडीत मागच्या सीटवरबसून प्रवास करताना दिसणार असल्याची माहिती त्याने दिली. मुफासा नावाचा हा सिंह दिसायला देखणा असला तरी त्याच्याबरोबर बसण्याचा धोका तुम्ही नक्कीच पत्करू शकत नसल्याचे तो म्हणाला. दिग्दर्शक प्रभू देवाचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.