चित्रपटसृष्टीत अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मानधनात असलेला फरक हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पण, बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोणने आतापर्यंत चालत आलेली ही रीत मोडीत काढली असून, स्वतःच्या अटींवर इंडस्ट्रीवर राज्य करण्यास सुरुवात केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘पद्मावती’ या भव्य चित्रपटासाठी दीपिकाने सहअभिनेते रणवीर सिंग आणि शाहिद कपूरपेक्षाही अधिक मानधन घेतल्याचे कळते.

वाचा : अक्षयचा ‘हा’ चित्रपट असेल २०१८ मधील सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’

चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ चित्रपट जास्तीत जास्त दीपिकाभोवतीच फिरणारा असल्यामुळे इतर कलाकारांच्या तुलनेत तिला सर्वाधिक मानधनाचा धनादेश देण्यात येईल. ‘पद्मावती’च्या कलाकारांच्या मानधनाविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. पण, हा चित्रपट पूर्णपणे दीपिकाशी निगडीत असल्याचे संजय यांचे स्पष्ट मत आहे. दीपिका यातील मुख्य स्त्री पात्र साकारत असून, चित्रपटाचे शीर्षकच तिच्यावर आधारित आहे. चित्रपटासाठी ती जवळपास १३ कोटी रुपये मानधन घेणार आहे. तर रणवीर आणि शाहिद यांना जवळपास प्रत्येकी १० कोटी रुपये मानधन मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. हे वृत्त खरे ठरल्यास बॉलिवूडमध्ये एक नवा पायंडा रचला जाईल. तसेच, दीपिकाच्या स्टारडममध्येही वाढ होईल आणि तिच्या भूमिकेला अधिक वजन येईल.

वाचा : चिमुकल्या मिशाने आजीसोबत केली शॉपिंग

काही दिवसांपूर्वीच २०१६मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगभरातील अभिनेत्रींच्या फोर्ब्स यादीमुळे दीपिका चर्चेत आलेली. त्यावेळी, भारतीय चित्रटपसृष्टीत कलाकारांच्या मानधनात असलेली विसंगती फोर्ब्सनेही निदर्शनास आणली. त्यांनी लिहिलेलं की, ‘भारतातील आघाडीचे अभिनेते प्रत्येक चित्रपटामागे जवळपास ५० लाख डॉलर कमवतात. तर, भारतीय अभिनेत्री जेमतेम १० लाख डॉलरपर्यंत पोहचतात.’ मानधनातील याच तफावतीमुळे दीपिकाला फोर्ब्स २०१७च्या यादीला मुकावे लागले. या यादीत हॉलिवूड अभिनेत्री एमा स्टोन हिला पहिले स्थान मिळाले.

‘पद्मावती’मध्ये दीपिका ‘राणी पद्मावती’च्या तर रणवीर ‘अल्लाउद्दीन खिल्जी’च्या भूमिकेत दिसेल. शाहिद कपूर यात ‘राजा रावल रतन सिंग’ची व्यक्तिरेखा साकारतोय. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.