कडाक्याची थंडी आणि त्या थंडीतही पहाटे लवकर उठून चाळीत किंवा आपण राहतो त्या सोसायटीत अॅटमबॉम्ब लावून सगळ्यांना जागे करणे, सुगंधी तेल आणि उटणे लावून कुडकुडणाऱ्या गारठय़ात केलेली आंघोळ, त्यानंतर देवपूजा, घरातील मोठय़ांना नमस्कार, सगळ्यांचा एकत्र फराळ, शेजाऱ्यांनाही फराळाचे ताट नेऊन देणे, देवळात जाणे असे चित्र काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे होते.
आता दिवाळीत कडाक्याची थंडी पडत नसली आणि फराळ करणे, देवळात जाणे, फटाके उडविणे, पहाटे लवकर उठणे यात कमी-अधिक बदल झाला असला तरी दिवाळीचा पहिला दिवस अर्थात दिवाळी पहाट साजरी करण्याचे स्वरूप मात्र बदलले आहे. कुटुंबीय आणि मित्र परिवारासह आपल्या घरी साजरी करण्यात येणारी दिवाळी पहाट आता ‘दारी’ साजरी होऊ लागली आहे. गिरगाव, डोंबिवली, विलेपार्ले, ठाणे अशा ठिकाणी भल्या पहाटेपासून रस्त्यावर उतरणारी तरुणाई याचेच प्रतीक आहे. याबरोबरच दिवाळी पहाटचे स्वागत सुरांच्या मैफलीने साजरे करण्याची पद्धत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून रूढ झाली आहे. मराठी चित्रपट संगीत, सुमग संगीत, भावसंगीत, नाटय़संगीत, लोकगीते ते अगदी शास्त्रीय संगीताच्या मैफली पहाटे रंगू लागल्या आहेत. दिग्गज गायकांसह नवोदित गायकांचा सहभाग हे या मैफलींचे वैशिष्टय़ म्हणता येईल. दिवाळीचा आनंद अशा संगीत मैफलीतून द्विगुणित होत आहे. दिवाळी पहाटच्या या संगीत मैफली फक्त मुंबई, पुणे, ठाणे, विलेपार्ले, डोंबिवली अशा शहरांपुरत्याच मर्यादित न राहता अगदी लहान गावात व खेडय़ातही आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी पहाटच्या सूर व संगीत मैफलीत रममाण झालेला पाहायला मिळत आहे.
घरातून बाहेर पडून सार्वजनिक स्वरूपात आणि सर्वाच्या सहभागातून साजऱ्या होणाऱ्या दिवाळी पहाटचे स्वरूप आनंददायी, उत्साही, मनावरील ताणतणाव, मरगळ दूर करणारे, दोन घटका आपले प्रश्न, समस्या आणि दु:ख विसरायला लावणारे आहे, याबद्दल कोणाचे दुमत असणार नाही. माहितीचे महाजाल, दूरचित्रवाहिन्या, संगणक, व्हॉट्स अॅप, फेसबुक यांचे आक्रमण झालेले असतानाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी पहाटच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कार्यक्रम मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, उमेद देण्याचे काम करत आहेत. आज ठीकठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात होत आहेत. चतुरंग प्रतिष्ठानने २९ वर्षांपूर्वी ‘दिवाळी पहाट’ही संकल्पना सुरू केली आणि आजचे त्याचे स्वरूप पाहता ती पूर्णपणे रुजली तर आहेच, पण सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला असल्याचे पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी साडतीनशेहून अधिक दिवाळी पहाट कार्यक्रम होतात. ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने याची सुरुवात केली तेव्हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगदी सकाळी सकाळी घरची सर्व कामे सोडून अशा कार्यक्रमांना कोण येणार, अशी शंका उपस्थित केली गेली होती. पण ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने ही संकल्पना यशस्वीपणे राबविली आणि आज सर्वत्र त्याचे अनुकरण होताना दिसत आहे.
दिवाळी पहाट कार्यक्रमात तोचतोपणा आला आहे, ठरावीक चेहरे आणि तीच ती गाणी ऐकायला मिळतात, त्यात नवीन काही नसते, असा टीकेचा सूरही आळवला जातो. तो क्षणभर खरा मानला किंवा त्यात तथ्य आहे असे म्हटले तर मग आता इतकी वर्षे झाल्यानंतर दिवाळी पहाट कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद कमी व्हायला हवा होता किंवा श्रोत्यांच्या अभावी हे कार्यक्रम इतक्या वर्षांनंतर बंद पडायला हवे होते. पण तसे झालेले नाही. दिवाळी पहाट संगीत मैफलींना रसिकांचा प्रतिसाद अजूनही मिळतो आहे. इतकेच नव्हे तर दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनात तरुणाईचा सहभाग वाढलेला पाहायला मिळत आहे. राहता राहिला तोचतोपणा किंवा तीच गाणी. पण मुळातच आपल्या पूर्वसुरींनी मराठी संगीतात अवीट गोडीची इतकी गाणी दिली आहेत की ती कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. आजही ती गाणी ऐकायला रसिकांना आवडते. त्यात ते रंगून जातात. त्याच्या स्मरणरंजनात जुन्या आणि नवीन पिढीलाही आनंद मिळतो. त्यामुळे साहजिकच दिग्गज गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिकांनी अजरामर केलेली गाणी पुर्नप्रत्ययाचा आनंद देतात. अर्थात काही दिवाळी पहाट कार्यक्रमांतून नवी गाणी किंवा संगीतात झालेले नवे प्रयोगही सादर केले जातात पण जास्त भर हा जुन्या व लोकप्रिय असलेल्या गाण्यांवरच असतो.
दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, यूटय़ूबमुळे कोणत्याही प्रकारचे संगीत व वेगवेगळ्या शैलीतील गाणी कधीही आणि कुठेही ऐकता आणि पाहता येत असली तरीही एखाद्या मान्यवर गायकाला प्रत्यक्ष ऐकणे आणि त्याच्या सुरांची जादू अनुभविणे यात एक वेगळाच आनंद आहे. ती मजा काही और असते. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही ते प्रत्येकाने प्रत्यक्ष उपस्थित राहूनच अनुभवले पाहिजे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातून मान्यवर आणि दिग्गज गायकांबरोबरच नवोदित गायकांनाही संधी मिळते. त्यांची कला ते लोकांपुढे सादर करू शकतात. दिवाळी पहाट कार्यक्रमातून ‘नवोदित’ म्हणून सुरुवात केलेले अनेक गायक-गायिका आज प्रथितयश झाले आहेत.
दिवाळी पहाट कार्यक्रम म्हणजे केवळ संगीत मैफल न राहता बदलत्या काळात तो ‘इव्हेंट’ झाला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षरश: लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गायक, वादक, व्यासपीठ सजावटकार, निवेदक, ध्वनिमुद्रण, ध्वनिसंयोजक, कॅटर्स अशा अनेकांना ‘व्यवसाय’ मिळाला आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहचा सण आहे. परस्पर संवाद आणि एकत्र येणे, मिळणारा आनंद फक्त आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता तो परस्परांमध्ये वाटणे, सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घेणे ही भावना आपल्या मनात जोपर्यंत आहे तोपर्यंत हे दिवाळी पहाट कार्यक्रम व संगीत मैफली सुरूच राहतील, त्या बंद होणार नाहीत. झालाच तर काळानुरूप त्यात काही बदल होईल इतकेच.