News Flash

फ्लॅशबॅक :  जेव्हा ‘पती परमेश्वर’ सेन्सॉरच्या कात्रीत सापडतो

सेन्सॉरच्या कैचीत सापडलेल्या चित्रपटांच्या कथा व्यथा खूप.

flashback, ajay devgnसेन्सॉरच्या कैचीत सापडलेल्या चित्रपटांच्या कथा व्यथा खूप. आर. के. नय्यर निर्मित व मदन जोशी दिग्दर्शित ‘पती परमेश्वर’ (१९९०) या चित्रपटाचे उदाहरण द्यायलाच हवे. या चित्रपटाची थीम थोडक्यात अशी; सुखाचा संसार सुरु असतानाच पती ( शेखर सुमन) एका तवायफच्या  (डिंपल खन्ना) प्रेमात वेडापिसा झाल्याने त्याची पत्नी ( सुधाचंद्रन) व्यथित होते, तो दारुच्याही आहारी जातो. त्याला आपलासा करण्याचे या परंपरावादी स्त्रीचे प्रयत्न व देवपूजा इत्यादी गोष्टी म्हणजे हा चित्रपट होता.

निर्माते आर. के. नय्यर म्हणजे अभिनेत्री साधनाचे पती. त्यांना ‘अनिता’, ‘गीता मेरा नाम’, ‘कत्ल’ इत्यादी चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव. तर मदन जोशी संवाद लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेले. हा चित्रपट निर्मितीवस्थेत थोडासा रखडला. कारण शेखर सुमन त्याच वेळेस ‘अनुभव’ ( पद्मिनी कोल्हापूरेसोबत), ‘उत्सव’ ( रेखासोबत) अशा काही चित्रपटांतून बिझी. तर डिंपलकडे ‘राम लखन’,  ‘काश’ असे अनेक चित्रपट. अशा वेळेस दोघांच्याही तारखा मिळवणे व जुळवून चित्रीकरण आखणे अवघड काम असते.

पण सेन्सॉरने चित्रपट असा काही कैचीत पकडला की त्यात तब्बल दीड वर्ष वाया गेले आणि मग वितरकांचाही या चित्रपटातील रस ओसरला. सेन्सॉरचा आक्षेप कशाला होता?  तर आपल्या पतीला तवायफच्या सौंदर्याच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठीच त्याची पत्नी प्रसंगी आपल्या वेशभूषेत फरक करते व अगदी मद्यपानही करते… सेन्सॉर म्हणाले भारतीय स्त्री काहीही झाले तरी या स्तरावर जाणार नाही. निर्मात्याच्या मते चित्रपटातील हाच भाग मोठी ताकद आहे. म्हणून ते रिवायझिंग समितीकडे म्हणजे दिल्लीत गेले. तेथून पुढची पायरी कोर्ट…. चित्रपटाची सुटका होईल या आशेने पुढे जाताना त्यासह वेळही वाया जात असतो. एव्हाना अशा चित्रपटाचे कथानक देखील माहीत पडते व त्यातील उत्सुकता ओसरते. गीत संगीतही जुने होते. चित्रपटाला पूर्वप्रसिध्दीने प्रदर्शित करण्यासाठी जोरदार फिल्मी पार्टीदेखिल झाली. पण काहीही फळले नाही. काही दृश्ये कापूनच चित्रपट प्रदर्शित करावा लागला. तोपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकताच ओसरली होती….

सेन्सॉरने अगदी सुरुवातीलाच घेतलेले आक्षेप चर्चेतून थोडेसे सोडवून घेता आले असते अथवा काही गोष्टींवर कात्री मान्य करताना संवादातून काही गोष्टी मांडण्याची तयारी ठेवली असती तर?…

पण आपल्या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही असे एकदा का निर्माता दिग्दर्शकाच्या मनात घट्ट रुजले की तो बराच काळ लढाईला जणू सामोरा जाण्यास तयार होतो व त्यातून फार काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा असेच घडते. ‘पती परमेश्वर’ त्यातील महत्त्वाचे उदाहरण. चित्रपटातील कलाकार मात्र अशा वेळेस काय करणार?
दिलीप ठाकूर 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:05 am

Web Title: flashback pati parmeshwar stuck in censorship
Next Stories
1 ‘काबिल’ निर्मात्याने ‘रईस’च्या कमाईबद्दल अशी दिली प्रतिक्रिया
2 पुण्यातील त्या सौंदर्यवती तरुणीमुळे शाहरुखचा सेल्फी व्हायरल
3 बॉलिवूडच्या खिलाडीने दिला मधुमेह टाळण्याचा सल्ला
Just Now!
X