केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली. शिवाय बँकेमधून पैसे काढण्यावरही मर्यादा आली ज्याचा परिणाम विविध व्यापारावर आणि व्यवसायावर झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सर्वत्रच आर्थिक अडचणींचा आणि काटकसरीचा काळ सुरु झाला आहे. चलनबंदीमुळे एटीएम आणि बँकांमध्ये रांग लावून पैसे काढण्यात व्यग्र असलेले मुंबईकर चित्रपटांकडे वळणार नाहीत अशी भीती वाटू लागल्यामुळे आगामी ‘फुगे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळते.
अभिनेता स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुगे’ चित्रपट येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, चलनबंदीच्या निर्णयामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित हा चित्रपट २ ऐवजी १६ डिसेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही? प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील की ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही केमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते. अशा या घनिष्ट मित्रांवर आगामी ‘फुगे’ हा चित्रपट आधारित आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.
दरम्यान, या गोंधळाच्या परिस्थितीतही ऑनलाइन बुकिंग करून प्रेक्षकांनी गेल्या दोन आठवड्यांत प्रदर्शित झालेल्या ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘वजनदार’ या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला. त्याउलट, याच काळात प्रदर्शित झालेला ‘रॉक ऑन २’ हा हिंदी चित्रपट सपशेल आपटला. तिस-या आठवड्यातही ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणारा आणि सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘व्हेंटिलेटर’ने दुस-या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली. काही ठिकाणी सिंगल स्क्रिन चित्रपटगृहात थोडासा परिणाम झाला असला तरी त्याची कसर मल्टीप्लेक्समध्ये भरुन निघतेय. ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टीक मनी इत्यादी पर्यायांचा वापर करुन प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेत आहेत हे विशेष. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळेच ‘व्हेंटिलेटर’ने अकरा कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.