असिफ बागवान

दी चित्रपटसृष्टीतील चार नामांकित समकालीन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चार लघुपट एकत्रितपणे चित्रपट म्हणून पडद्यावर येणे, हा प्रयोग तसा अनोखाच. त्यामुळेच २०१३मध्ये करण जोहर, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी आणि झोया अख्तर यांच्या लघुपटांचा गुच्छ असलेला ‘बॉम्बे टॉकीज’ प्रचंड लोकप्रिय झाला. भारतीय सिनेमाला १०० वर्षे पूर्ण होत असतानाच सिनेमाचं सर्वसामान्य जनतेच्या मनातलं स्थान अधोरेखित करणाऱ्या कथांच्या लघुपटांचा हा संग्रह समीक्षकांनाही भावला. परस्परांपेक्षा वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवणाऱ्या चार दिग्दर्शकांची ही ‘युती’ अशीच नवनिर्मिती करत राहो, असा सूरही त्या वेळी उमटला. मात्र, तसं घडायला पाच वर्षे जावी लागली. तोपर्यंत मनोरंजनाचा ओघ वेबवर आला होता. ओटीटी नावाचा हा नवफलाट सिनेमागृहाइतकाच ताकदीचा असल्याची प्रचीती येऊ लागली होती. त्यामुळे या चौकडीचा ‘लस्टस्टोरीज’ जेव्हा ‘नेटफ्लिक्स’वरून प्रसारित झाला तेव्हा त्याचं यश ‘बॉम्बे टॉकीज’लाही झाकोळणारं होतं. भारतात ‘नेटफ्लिक्स’ लोकप्रिय होण्यामागे ‘लस्टस्टोरीज’चा फार मोठा हात आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कोणतंही ओंगळवाणं दर्शन न घडवता स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल भाष्य करणाऱ्या या लघुपटांचा तो संग्रह होता. हा प्रयोग लोकप्रिय झाल्यापासूनच या चौकडीच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा होती. तो म्हणजे ‘घोस्टस्टोरीज’ हा चित्रपट नुकताच ‘नेटफ्लिक्स’वरून प्रसिद्ध झाला.

‘घोस्टस्टोरीज’ हे नाव वाचल्यानंतर तो भयपट आहे, हे सांगायला नको. मात्र, त्याबद्दल सांगण्यापूर्वी ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण तेच या चित्रपटाचं मूळ वैशिष्टय़ आहे. अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर या चौघांच्या दिग्दर्शनाचं प्रभाव क्षेत्र परस्पर भिन्न आहे. मात्र, यापैकी कुणीच आजवर प्रत्यक्षपणे भयपट केलेला नाही. आपापल्या धाटणीच्या विषयांवरील सिनेमे बनवण्यात पारंगत असलेले हे चौघेही ‘घोस्टस्टोरीज’च्या निमित्ताने सामायिकपणे एका नव्या पटावर कौशल्य सादर करत आहेत.  हे ‘घोस्टस्टोरीज’चे वैशिष्टय़च.

यातली पहिली गोष्ट आहे झोयाची. एकेकाळी ऐश्वर्य अनुभवलेल्या मात्र, आता वापर नसल्यामुळे खंगल्यागत झालेल्या एका इमारतीतील घरात अंथरुणाला खिळून असलेल्या मिसेस मलिक (सुरेखा सिक्री) यांची देखभाल करण्यासाठी नेमलेली नर्स समीरा (जान्हवी कपूर) यांच्यातली ही गोष्ट आहे. पक्षघातामुळे नीट बसताही येत नसलेल्या मलिक यांना त्यांच्या मुलाची प्रतीक्षा आहे. त्यातून त्यांची सतत सुरू असलेली बडबड आणि ओरडणे समीराला पसंत नाही. किंबहुना ती नाइलाजानेच परिचारिकेच्या नोकरीत आहे. प्रियकर गुड्ड (विजय वर्मा) याचा सहवास मिळेल, या आशेने त्या घरात ती तयार होऊन वाट पाहात बसली आहे. अशा परिस्थितीत त्या घरात घडणारं नाटय़ झोयाने या कथेतून मांडलं आहे. अनुरागची कथा गर्भवती असलेली नेहा (सोभिता धुलिपला) हिच्याभोवती केंद्रित आहे. सोभिताकडे सांभाळायला असलेला तिच्या दिवंगत बहिणीचा मुलगा, त्याचे वडील आणि या दोघांचाही राग असलेला सोभिताचा पती ही पात्रेही त्यात आहेत. पोटात वाढत असलेल्या बाळाच्या आगमनाची उत्कंठा असलेल्या सोभिताची स्वत:बद्दल विशेष काळजी घेणं, तिच्या येणाऱ्या बाळामुळे आपल्याला मिळणारं मावशीचं प्रेम आटेल, अशी असूया बाळगणारा तिचा भाचा यांच्या मानसिक अवस्थांतरातून अनुरागने आपला भयपट उभा केला आहे. तर दिबाकर बॅनर्जीची कथा सारेच गावकरी झोम्बि बनलेल्या एका गावात आकार घेते. अवघं गाव नरभक्षक बनलेल्या या ‘बीसघरा’त स्वत:चा बचाव करून राहिलेली दोन मुलं (आदित्य शेट्टी आणि इवा परदेशी) आणि बदली झाल्यामुळे पहिल्यांदाच गावात आलेला एक व्यक्ती (सुकांत गोयल) ही या कथेची मुख्य पात्रं. शेजारच्या सौघरा या मोठय़ा गावाच्या सरपंचाने माणसं खाण्यास सुरुवात केल्यानंतर सुरू झालेलं हे नाटय़ पुढे अनेक वळणं घेतं. करण जोहरची गोष्ट गोव्यातील एका महालात राहणाऱ्या अतिश्रीमंत कुटुंबाची आहे. या कुटुंबातील मुलगा ध्रुव (अविनाश तिवारी) आणि इरा (मृणाल ठाकूर) यांचं लग्न ठरतं. मनाजोगता आणि श्रीमंत नवरा मिळाल्यामुळे इराला ध्रुवचं त्याच्या आजीबद्दलचं अतिप्रेम कोडय़ात पाडत असतं. कारण ध्रुवची आजी मरून अनेक वर्ष झाली असतानाही ती जिवंत असल्याप्रमाणे तो आजीशी गप्पा मारत असतो. त्य़ाचं हे वेड संपवून सुखाचा संसार करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या इराला पुढे काय अनुभव येतात, हे ती गोष्ट सांगते.

चारही दिग्दर्शकांनी कथानकांसाठी निवडलेली पार्श्वभूमी अतिशय वेगवेगळी आहे. झोयाची गोष्ट आजच्या काळातली तर अनुरागची जुन्या जमान्यातली, दिबाकरची एका खेडय़ातली तर करणची एका आलिशान महालातली. या वैविध्यामुळे प्रत्येक लघुपट वेगळा ठरतो. संपूर्ण कथानक सांगून वाचकांचा हिरमोड करायचा नाही. मात्र, भीती हा ‘घोस्टस्टोरीज’चा आत्मा असल्यामुळे त्यात भूत आणि भय किती याचं मोजमाप करणं आवश्यक आहे. चारही कथानकांमध्ये धक्का फॅक्टर आहे. ‘कहानी में ट्विस्ट’ म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट शेवटाकडे जाताना एक धक्कादायक वळण घेते. मात्र खंत अशी की, हे वळण धक्कादायक असलं तरी अनपेक्षित नसतं. त्यातल्या त्यात दिबाकर बॅनर्जीच्या गोष्टीतील धक्का फॅक्टर प्रभावी आहे. मात्र, त्यात भीतीपेक्षा दिबाकरने आपल्या कथानकातून केलेल्या सामाजिक भाष्यामुळे ते प्रभावी झाले आहे. रूपकांचा उत्तम वापर करून दिबाकरने समाजातील दांडगे विरुद्ध दीन यांच्यातील लढाई भडकपणे मांडली आहे. अनुरागच्या कथेत शेवटी काय होईल, याचा अंदाज बांधता येतो. मात्र, तो ज्या पद्धतीने मांडला आहे, ती पद्धत धक्का देण्यापेक्षा भ्रमनिरास करणारी अधिक आहे.

थोडक्यात काय तर, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘लस्ट स्टोरीज’मध्ये आपलं कसब दाखवणाऱ्या या चारही दिग्दर्शकांना भयकथेच्या पटावर प्रभाव पाडणं जमलेलं नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे आहात आणि अचानक मागून येऊन कुणीतली ‘भ्भौ’ केलं तर सुरुवातीला आपण दचकतो, पण मागे वळून पाहिल्यानंतर काही क्षणात आपण खजिल होतो. घोस्टस्टोरीज पाहिल्यानंतर तोच अनुभव येण्याची शक्यता आहे.