सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस. ‘सैराट’नंतर दिग्दर्शक म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन चित्रपट करणारा असं त्याचं कौतुक झालं. त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १९७७ रोजी झाला. ते उत्तम कविताही करतात. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. नागराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्याच शब्दातून रचलेली ही खास काव्यमैफल तुमच्यासाठी:

१. ‘पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती..
म्हणूनच की काय
वेळी अवेळी
रस्त्याने येता जाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकीसमोर
कोसळत राहायचा
तासन् तास…!’

२. माझ्या हाती
नसती लेखणी
तर
तर असती छिन्नी
सतार, बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला!

३. मित्र
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली

४. ओवणी
ओठांत कुठवर चिरडाव्यात
अंतरीच्या हाका
कवितेच्या सुईने किती
घालावा टाका
जखम चिघळते
घातलेल्याच टाक्यातून
आकाश कोण ओवतं
सुईच्या नाकातून

५. मुके पैंजण
एकटेपणाचे हे जीवघेने तट…
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण मी आता माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.