सिनेमा हा समाजात घडणाऱ्या घटनांचा आरसा असतो असे म्हणतात. निखळ मनोरंजनासोबतच सिनेमा प्रबोधनही करत आला आहे. हिंदी किंवा मराठी सिनेमासृष्टीत नायक, नायिका आणि खलनायक या त्रिकोणाशिवाय सिनेमा पूर्ण होताना दिसत नसे असा एक काळ होता. सध्याचा ट्रेंड आहे तो नायिका प्रधान सिनेमांचा. ज्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत नायिका असते. नायिकेसाठी सिनेमा लिहिला जातो. सिनेमा तिच्या भोवती फिरतो. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर किंवा ती सहन करत असलेल्या समस्यांभोवती सिनेमा फिरतो. अनेकदा ती सगळी बंधने झुगारून नेमका काय पर्याय स्वीकारते हे सांगणाराही ठरतो. ‘पिंक’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘पार्च्ड’, ‘मॉम’, ‘इंग्लिश विंग्लिश’ ,’क्वीन’, ‘पद्मावत’ ही आणि अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सिनेमांमध्ये नायिका ही मध्यवर्ती होती. तिच्याभोवती सिनेमा फिरत होता. फक्त कचकडीची बाहुली किंवा हिरो आणि व्हिलनच्या मध्ये थोडासा विरंगुळा म्हणून किंवा अगदी नाच-गाण्यापुरती नायिका अशा इमेजमधून अभिनेत्री कधीच बाहेर पडल्या आहेत. महिला दिनी या प्रगतीचीही चर्चा महत्त्वाची आहे.

भारतीय सिनेमात स्त्रीचे स्थान महत्त्व अधोरेखित करण्याआधी थोडासा मागोवा घेणे आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात मूकपटांमध्ये स्त्री भूमिकाही पुरुष करत. मात्र १९३१ मध्ये आलम आरा हा पहिला बोलपट आला ज्यामध्ये झुबेदा बेगम या अभिनेत्रीने भूमिका साकारली होती. तर पृथ्वीराज कपूर हे या सिनेमात नायकाच्या भूमिकेत होते. राजपुत्र आणि एका भटक्या मुलीची प्रेमकथा या सिनेमात साकारण्यात आली होती. त्यानंतर स्त्री ही सिनेमाचा अविभाज्य भाग झाली. मात्र तिच्याभोवती फिरणारा सिनेमा येण्यासाठी १९५७ हे वर्ष उजाडावे लागले. ‘मदर इंडिया’ या सिनेमात नर्गिस या अभिनेत्रीने जी भूमिका केली त्याला तोड नाही. हा सिनेमा एका आईचे आयुष्य रेखाटणारा होता. सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार या दोन मुलांना समर्थपणे सांभाळणारी आई नर्गिस यांनी या सिनेमात साकारली. हा सिनेमा खरेतर १९४० मध्ये आलेल्या औरत या सिनेमाचा रिमेक होता. मात्र या सिनेमाची कथा आणि त्यात नर्गिस यांनी साकरलेली भूमिका इतकी प्रभावी ठरली की या सिनेमावर बक्षीसांचा वर्षाव झाला. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार पेक्षा जास्त फिल्मफेअर पुरस्कारांनी या सिनेमाचा गौरव झाला. नर्गिस यांच्यानंतर नूतन यांनीही बंदिनी, सरस्वती चंद्र, सीमा, सुजाता यांसारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. मधुबाला यांच्या असीम सौंदर्यामुळे तर त्यांचे चाहते त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी जात. मुगल-ए-आझम या सिनेमातली अनारकली त्यांनी अजरामर केली. हावडा ब्रिज सिनेमातील आईयें मेहरबाँ गाणे कसे विसरता येईल? अवखळ, सुंदर, मोहक मधुबाला यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांचे कौतुक झाले. अभिनेत्री मीना कुमारी यांनीही स्त्रीच्या समस्या किंवा तिच्या अंतर्मनात सुरु असलेली खळबळ आपल्या भूमिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. बैजू बावरा, काजल, दिल एक मंदिर, साहेब बिबी और गुलाम, मैं चुप रहुंगी, शारदा या आणि अशा सिनेमांतून त्यांनी स्त्रियांची व्यथा पडद्यावर मांडली. त्यांच्यासोबतच वैजयंती माला यांचाही उल्लेख विसरता येणार नाही. मधुमती, नागीन, संगम, नया दौर या आणि अशा विविध सिनेमांमधून त्यांनी आपले अभिनय आणि नृत्यकौशल्य दाखवत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

१९७० आणि ८० चे दशक गाजवले ते स्मिता पाटील यांनी अर्थ, आखिर क्यूँ, भूमिका, मंडी, बाझार, मंथन, मिर्च मसाला या सिनेमांधून त्यांनी साकारलेल्या भूमिका स्त्रीचे महत्त्व आणि तिचे अन्यायाविरोधात पेटून उठणे दाखवणाऱ्याच ठरल्या. त्यांच्या मराठीतील उंबरठा या सिनेमाचेही कौतुक झाले. त्यात त्यांनी साकारलेली भूमिका माईलस्टोन ठरली. समांतर सिनेमात काम करणे आणि त्यातील भूमिका जिवंत करणे हा तर त्यांचा हातखंडा होता. या चित्रपटात त्यांचा एक प्रेक्षकवर्ग होता. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘क्लास’ आणि ‘मास’ या दोन प्रकारांपैकी स्मिता पाटील यांनी कायमच ‘क्लास’ या प्रेक्षकवर्गासाठीचे चित्रपट केले. समीक्षकांनी त्यांच्या भूमिकांचे कौतुकही केले. झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती कायमच त्या काळातील स्त्रीला आपलीशी वाटत राहिली. ‘भूमिका’ आणि ‘चक्र’ या दोन सिनेमांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘जैत रे जैत’ या सिनेमात त्यांनी साकारलेली ‘चिंधी’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९८५ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

अभिनेत्री रेखा यांनीही अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच रेखा यांनी त्यांच्या तोडीस तोड अभिनय करत सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘उमराव जान’, ‘खुबसुरत’,’उत्सव’, ‘घर’ या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विसरता येणे अशक्य आहे. तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत साकारलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘सिलसिला’ या सिनेमातील भूमिकाही विशेष गाजल्या. तसेच ‘खून भरी माँग’, ‘मुझे इन्साफ चाहिये’, अशा सिनेमांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका सशक्त अभिनयाचे दर्शन देत राहिल्या. त्यांच्यासोबतच हेमा मालिनी, जया भादुरी, आशा पारेख, शर्मिला टागोर, मुमताज यांनीही व्यावसायिक सिनेमांमध्ये भूमिका साकारत लोकप्रियतेचे शिखर गाठले. जया भादुरी यांच्या ‘कोरा कागज’ या सिनेमात मुलीच्या संसारात आई वडिलांनी लक्ष घातले की काय दुष्परिणाम होतात यावर भाष्य करण्यात आले होते. मात्र असे काही चित्रपट अपवादानेच येत राहिले.

८०-९० चे दशक गाजवले ते श्रीदेवी, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री यांनी श्रीदेवी या अशा अभिनेत्री होत्या ज्यांच्यासाठी भूमिका लिहिल्या जात. ‘सदमा’ या सिनेमात सुपरस्टार कमल हसन होते. मात्र लक्षात राहिली ती श्रीदेवी यांनी साकारलेली अवखळ भूमिका. ‘नगीना’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘लाडला’ या सिनेमांपासून ते अगदी ‘मॉम’, आणि ‘इंग्लिश-विंग्लिश’ या सिनेमापर्यंत अनेक भूमिका श्रीदेवी यांनी साकारल्या आणि जिवंत केल्या. सिनेसृष्टीतील ‘लेडी अमिताभ’ असे त्यांना म्हटले जात असे. ‘खुदा गवाह’ या सिनेमात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या भूमिका तोडीस तोड आहेत. नायकाच्या बरोबरीने नायिकेला स्थान असले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या श्रीदेवी या बहुदा पहिल्याच अभिनेत्री असाव्यात. मीनाक्षी शेषाद्री यांनीही अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या मात्र त्या आजही ओळखल्या जातात त्यांच्या ‘दामिनी’ या सिनेमामुळेच. सिनेमात ऋषी कपूर, सनी देओल असे दोन हिरो असूनही मीनाक्षी शेषाद्री यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या सिनेमातली भूमिका अमर केली. त्यानंतर क्रेझ निर्माण झाली ती माधुरी दीक्षितची. ‘हम आपके हैं कौन’, ‘अंजाम’, ‘तेजाब’ ते अगदी ‘गुलाब गँग’पर्यंत माधुरी दीक्षित यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्यासाठीही भूमिका लिहिल्या जात होत्या. डिंपल कपाडिया यांनी ‘बॉबी’ सिनेमातून बोल्ड भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र त्यांचा ‘रुदाली’ हा सिनेमा कधीही विसरता येणार नाही. त्यानंतर ९० आणि त्यापुढच्या दशकांसाठी नाव घ्यावे लागेल ते तब्बूचे. एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत तब्बू यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘अस्तित्त्व’ मधली आदिती श्रीकांत पंडित, ‘चांदनी बार’ सिनेमातील बार डान्सरची भूमिका, ‘माचिस’, ‘हूतूतू’ या चित्रपटांमधल्या भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या ठरल्या. तर ‘हेराफेरी’ आणि काही महिन्यांपूर्वीच आलेल्या ‘गोलमाल अगेन’मध्ये त्यांनी अवखळ भूमिकाही साकारल्या.

नायिका प्रधान सिनेमांसाठी श्रीदेवी यांच्यानंतर तब्बू या ‘ट्रेंडसेटर’ ठरल्या असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्यानंतर अभिनेत्रीला मध्यवर्ती भूमिकेत दाखवून सिनेमा तिच्या जोरावर पुढे नेण्याचे प्रयोग सुरु झाले. ‘डोर’ सिनेमातील आयेशा टाकिया आणि गुल पनाग या दोघींमध्ये समान धागा दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नागेश कुकूनूरने केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही मात्र या सिनेमाचा विषय नक्कीच वेगळा होता. त्यानंतर ‘पेज थ्री’ या सिनेमात एका महिला पत्रकाराभोवती फिरणारी कथा होती. या सिनेमात कोंकणा सेनशर्मा मध्यवर्ती भूमिकेत होती. ‘फॅशन’ या सिनेमात मॉडेल्सचे विश्व साकारण्यात आले. या सिनेमात
प्रियंका चोप्रा आणि कंगना रणौत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमा प्रियंका चोप्रा भोवतीच फिरणारा होता. स्ट्रगलिंग मॉडेल ते प्रसिद्धीच्या शिखरावर जाणारी मॉडेल आणि त्यावरून कोसळून पुन्हा सावरणारी मॉडेल तिने साकारली. विद्या बालन हे नावही असेच आहे विद्या बालनच्या नावावर चित्रपट चालतात याचा प्रत्यय ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘तुम्हारी सुलू’, ‘बेगम जान’, ‘परिणीता’, ‘इश्कियाँ’ या चित्रपटांत साकारलेल्या तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे आला. दीपिका पदुकोणनेही ‘पिकू’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमातून अपेक्षित यश आणि वाहवा मिळवली. कंगना रणौतचे चित्रपटही विसरुन चालणार नाहीत. ‘क्वीन’, ‘रिव्हॉल्वर रानी’ ‘सिमरन’, ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमांमधील तिच्या भूमिका वेगळ्या आहेत. दीपिका आणि कंगनासाठीही वेगळे रोल लिहिले जाऊ लागले आहेत. सोनम कपूरनेही ‘नीरजा’ सिनेमात एअरहोस्टेस नीरजा भानोतची भूमिका साकारत सगळ्यांचे लक्ष वेधले. सध्याच्या घडीला विद्या बालन, कंगना रणौत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा यांच्यासाठी वेगळ्या भूमिका लिहिल्या जात आहेत. सिनेमांतील ‘आय कँडी’ ही नायिकेची असलेली प्रतिमा पुसून टाकण्यात या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींचा मोठा वाटा आहे.

वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

‘पार्च्ड’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘पिंक’ या सिनेमांचा विशेष उल्लेख करावा लागेल कारण या सिनेमांमध्ये नायिकाच कथेचा गाभा आहेत. समाजाविरोधात, यंत्रणेविरोधात पुकारलेला लढा आणि आपल्याला हवे असलेल्या गोष्टी करण्याची जिद्द यातून एकमेकींना समजून घेणे, हे सारे काही या चित्रपटांमधील नायिकांनी साकारले आहे. या सिनेमांमध्ये हिरो हा प्रकारच नाही. तरीही या चित्रपटांची दखल रसिकांनी घेतली हे विशेष. येत्या काळातही असे अनेक प्रयोग बघायला मिळतील यात शंका नाहीये.

मराठी सिनेमांचा विचार करता ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमांमधली अभिनेत्री सशक्त होती. ‘सैराट’मधली रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ किती प्रसिद्ध झाली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. नुकत्याच आलेल्या ‘आम्ही दोघी’ सिनेमातही मुक्ता बर्वेचा अभिनय दाद देण्याजोगा आहे. हिंदी इतके प्रयोग मराठीत होताना दिसत नाहीयेत. पण ते होत आहेत ही बाब निश्चितच समाधानाची आहे.

सिनेसृष्टीच्या १०० पेक्षा जास्त वर्षात बरीचशी उलथापालथ झाली. यामध्ये सिनेमानेही कात टाकली. सध्याचा सिनेमा हा डिजिटल झाला आहे. अशात हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत ही गोष्ट निश्चितच अभिमानाची आहे यात शंका नाही.

समीर जावळे
sameer.jawale@indianexpress.com