अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा ‘मी टू’ #MeToo मोहिमेची चर्चा सुरू झाली. ही पुरुषांविरुद्ध स्त्रियांची मोहीम नसून अन्यायाविरुद्ध न्यायाची ही लढाई आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिली. तनुश्री- नानाच्या वादानंतर बॉलिवूडमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. एक गट तनुश्रीला तर एक गट नानांना साथ देत आहे.

‘जर कोणी भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारच्या शोषणाला सामोरं जात असेल, तर त्या व्यक्तीची साथ देणं गरजेचं आहे. हा काही पुरुषांविरुद्ध स्त्रियांचा लढा नाही. या विषयावरील संवादाचा गुंता वाढवण्याची गरज नाही. माझ्या मते, #MeToo ही अन्यायाविरुद्ध न्यायाची मोहीम असावी. ती कोणत्याही लिंगापुरती मर्यादित नसावी,’ असं दीपिका म्हणाली. दीपिकाने रणवीर सिंगसोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी रणवीरलाही तनुश्री- नाना वादावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

‘कोणत्याही प्रकारचं शोषण खपवून घेता कामा नये. मग ती महिला असो किंवा पुरुष. हे शोषण कामाच्या ठिकाणी असो, सार्वजनिक ठिकाणी असो किंवा घरात, त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. शोषणाविरोधात बोलण्यासही खूप मोठी हिंमत लागते. लोकांसमोर आपलं म्हणणं मांडणं सोपं नसतं. त्यामुळे ती व्यक्ती काय म्हणत आहे, हे ऐकणं गरजेचं आहे. तनुश्रीच्या बाबतीत जर असं काही घडलं असल्यास ते अत्यंत चुकीचं आहे आणि मी त्या घटनेची निंदा करतो,’ असं रणवीर म्हणाला.

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला. नानांनी तिचे हे आरोप फेटाळले असून तिला कायदेशीर नोटीसदेखील बजावली आहे. दरम्यान नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत.