‘कलर्स मराठी’वर रविवार, १५ एप्रिलपासून बहुचर्चित ‘बिग बॉस’ हा नवा कार्यक्रम सुरू होत असून संध्याकाळी सात वाजता त्याचे प्रसारण होणार आहे. त्यानंतर सोमवार ते शनिवार दररोज रात्री साडेनऊ वाजता आणि रविवारी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. ‘बिग बॉस’च्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित..

*  मराठी प्रेक्षकांना मराठी ‘बिग बॉस’मधून नेमके काय पाहता येणार आहे?

‘नाटक’ हा लोकांच्या आवडीचा विषय असून तो पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच तयार असतात. त्यातही  ‘नाटक’ संहिता स्वरूपात नसेल तर ते पाहण्यात अधिक रंगत येते. ‘बिग बॉस’मधून प्रेक्षकांना चौकटी बाहेरचे ‘नाटक’ पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे ‘बिग बॉस’  मानवी नातेसंबंध आणि स्वभावांच्या विविध पैलूंचा उलगडा करणारा वास्तवदर्शी कार्यक्रम आहे. मानवी मानसशास्त्राचे उत्तम दर्शन घडविणारा कार्यक्रम म्हणून तो जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांच्या पर्वाना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. मराठी चित्रपटसृष्टी एका कुटुंबासारखी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थेट कलाकारांशी संवाद साधता येतो. त्यांच्याबद्दल एक आदर आणि आपलेपणा प्रेक्षकांमध्ये असतो. तसेच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रेक्षक आणि माध्यमे अशा दोन्ही बाजूंनी फारशी ढवळाढवळ होत नाही. मात्र ‘बिग बॉस’च्या माध्यमातून आवडत्या कलाकाराचे खरे व्यक्तिमत्त्व, त्याचा स्वभाव पाहण्याची संधी मराठी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच एखाद्या कलाकाराविषयीचे मतपरिवर्तनही होईल आणि एखाद्या कलाकाराविषयी काही सत्य गोष्टीही उघड होतील. कार्यक्रमाचा मूळ गाभा हाच असल्याने त्यात वेगळी गंमत असेल. ‘बिग बॉस’ मध्ये मराठीपण जपण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे.

* ‘बिग बॉस’ आणि महेश मांजरेकर हे समीकरण कसे असेल?

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची मूळ संकल्पना वास्तवदर्शी असल्यामुळे मीदेखील लोकांसमोर मुख्य म्हणजे कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांशी रोखठोक राहण्याचा प्रयत्न करणार आहे. नाटक-चित्रपट किंवा इतर दैनंदिन मालिका, रिअ‍ॅलिटी शोसारखा हा कार्यक्रम लिखित स्वरुपाचा नाही. त्यामुळे सहभागी स्पर्धक आपला मूळ स्वभाव घेऊन बिग बॉसच्या घरात शंभर दिवस राहणार आहेत. कॅमेऱ्यासमोर जे काही होईल ते अंतिम असेल, त्यामुळे ठरवून करण्यासारखे या कार्यक्रमात काहीही नाही. कार्यक्रमाची बांधणीच मूळ स्वभाव आणि त्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या खऱ्या गुणांचे दर्शन घडविणे अशी असल्याने, सूत्रसंचालनामध्येही तो खरेपणा टिकवून ठेवणार आहे. महेश मांजरेकर हेच व्यक्तिमत्त्व सूत्रसंचालनात दिसेल. कार्यक्रमामध्ये आठवडय़ादरम्यान होणाऱ्या घटनांचा अभ्यास करुन स्पर्धकांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. थोडक्यात रोखठोक  बोलणे हे माझे काम असणार आहे.

*  सहभागी स्पर्धकांशी संबंध कशा पद्धतीने राहतील?

कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या पंधरा स्पर्धकांना शंभर दिवसांसाठी एका घरामध्ये कैद करण्यात येणार आहे. त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे साधन नसेल. तसेच वेळ जाणून घेण्याचे कोणत्याही प्रकारचे माध्यम नसेल. घरामध्ये असलेल्या माणसांशी जुळवून  त्यांना हा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आठवडय़ाच्या शेवटी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा आणि विरंगुळ्याचे क्षण देण्याचा प्रयत्न तसेच त्यांच्या हातून घडलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याऐवजी त्यांना त्याची अप्रत्यक्षरीत्या जाणीव करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

* कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेविषयी प्रेक्षकांमध्ये मतभेद आहेत, मराठी ‘बिग बॉस’मध्ये विश्वासार्हता कशापद्धतीने जपली जाईल?

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम आखिव-रेखीव नाही. त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप कार्यक्रमात आणि घडणाऱ्या घटनांमध्ये असणार नाही. कार्यक्रमाच्या मूळ ढाच्याप्रमाणे त्याची निर्मिती होईल. मात्र त्यानिमित्ताने घडणाऱ्या घटनांशी आमचा संबंध असणार नाही. कॅमेऱ्यासमोर जे काही घडेल ते क्षणिक आणि वास्तवदर्शी असेल. सर्व स्पर्धकांना शंभर दिवस एकाच छताखाली राहायचे असल्याने कार्यक्रमाची संहिता तयार करणे शक्य नाही. दीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारचा वेगळा कार्यक्रम मराठीत सुरू होत असून मराठी प्रेक्षक त्याचे नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास आहे.