अभिनेता हृतिक रोशनची दोन्ही मुलं अगदी त्याच्यासारखीच उत्तम अॅथलिट आहेत. सध्या हृदान आणि रेहानसोबत हृतिक सुट्ट्यांचा आनंद उपभोगत आहेत. हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिघांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हृतिकचे हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. हृतिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, मी त्यांना एका हिरोसारखी पोझ द्यायला सांगितली. पण, माहित नाही त्यांच्या डोक्यात काय होते. त्यांनी अशी पोझ दिली. तर दुसऱ्या फोटोलाही त्याने लक्षवेधी कॅप्शन दिले.

या दोन्ही फोटोंना तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले, यात सुझान खानच्या लाइक्सचाही समावेश होता. हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट होऊन काळ लोटला. पण तरीही ते दोघं मुलांसोबत अनेकदा चांगला वेळ घालवताना दिसतात. हृतिकला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं म्हणजे एक प्रकारचं मनोरंजनच असते. काही दिवसांपूर्वी त्याने हृदान आणि रिहानसोबतच्या संभाषणाचा एक फोटो शेअर केला होता. दोघा चिमुकल्या भावांपैकी एकाने दुसऱ्याला वडील एका गोष्टीसाठी मान्य झाले असल्याचे सांगितले ज्याबद्दल हृतिकला काही कल्पनाच नव्हती. ‘तो- …काळजी करू नकोस, बाबांची त्या गोष्टीला काही हरकत नाही असं ते स्वत: म्हणाले’, ‘मी- काय?’ असे अनोखे कॅप्शन हृतिकने आपल्या पोस्टला दिले होते.

जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काबिल’ या सिनेमात हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौतमही दिसली होती. हृतिक लवकरच विकास बेहल याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. पटना येथी गणिताचे शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. याशिवाय क्रिश ३ सिनेमाची तयारीही जोरात सुरू आहे.