बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे. “शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा सोनू सध्या बराच चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. मात्र अनेकांना मागील काही दिवसांपासून काही प्रश्न पडले आहेत जसं सोनूला दिवसाला किती मेसेज येत असतील?, तो झोपतो की नाही?, तो दिवसातून किती तास काम करतो? हे आणि असे अनेक प्रश्न त्याला त्याचे चाहते ट्विटवरुन विचारत आहेत. मात्र त्यानेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात महिती दिली आहे.

“स्थलांतरितांबद्दल चौकशी करण्यासाठी रोज मला फोन येतात आणि आज किती लोकांना पाठवणार आहात असं विचारलं जातं. मला दिवसाला देशभरातून ५६ हजारहून अधिक मेसेज येत आहेत,” असं सोनू सांगतो. हे काम आव्हानात्मक असलं तरी ते करताना छान वाटत आहे असं सोनूने सांगितलं. दिवसातील १८ तास सोनू स्थलांतरितांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यासंदर्भातील सन्मवय करण्याचे, प्रत्यक्ष बसची व्यवस्था पहायला जाण्याचे काम करण्यात व्यस्त असतो. “हे आव्हानात्मक आहे पण काम करताना आनंद मिळत आहे. देव काय काय शिकवतो आणि काय काय काम करुन घेतो आपल्या हातून. खरचं हे खूप छान आहे. मला देशभरातील लोकांकडून प्रेम मिळत आहे,” अशा शब्दांमध्ये सोनूने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सोनूने २७ मे रोजी येणाऱ्या मेसेजेसचा ओघ दाखवण्यासाठी एक ट्विट केलं होतं. यामध्ये फोन स्क्रीनवर किती वेगाने मेसेज येत आहेत हे दिसत होतं. “तुमचे मेसेज आम्हाला या वेगाने मिळत आहेत. मी आणि माझी संपूर्ण टीम तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र यामध्ये आमच्याकडून काही मेसेज वाचायचे राहून गेले तर त्यासाठी तुम्ही मला माफ करा,” अशी कॅप्शन सोनूने हे ट्विट करताना दिली होती.

‘तू सकाळी किती वाजल्यापासून या कामाला सुरुवात करतो?’, असा प्रश्न सोनूला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने, “आम्ही झोपतोच कुठे? कधी मी पहाटे चारपर्यंत जागा असतो तर कधी सहापर्यंत. रात्रभर रिप्लाय करणे आणि समन्वय साधण्याचे काम सुरु असतं,” असं उत्तर दिलं.