चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधील यशस्वी वाटचालीनंतर अभिनेता, लेखक शरद केळकरने एका वेगळ्याच क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली. ईडक या मराठी सिनेमाच्या निमित्ताने निर्माता म्हणून तो प्रेक्षकांसमोर आला. ३२ वर्षीय नाम्याभोवती या सिनेमाची कथा गुंफलेली आहे. तीर्थयात्रेला जाणाऱ्या नाम्याला त्याची आई एका बकरीचा बळी देण्याचा आग्रह धरते. नाम्याचं आणि त्याच्या आईचं नातं आणि बकरी मिळवण्यासाठी नाम्याची चाललेली धडपड या सिनेमा मध्ये दाखवण्यात आलेली आहे. दीपक गावडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केल असून संदीप पाठक आणि उषा नाईक यांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सिनेमा निर्मिती क्षेत्रात येण्याबाबत बोलताना शरद केळकर म्हणाला “प्रभावी कथा मांडायला मला नेहमीच आवडतं. प्रेक्षकांपर्यंत एक प्रभावी कथा पोहचवण्यासाठी मी या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. दिग्दर्शक दीपक गावडे यांनी ही कथा वाचून दाखवल्यानंतर मी त्या क्षणी हा सिनेमा निर्मित करण्याचा निर्णय घेतला. झी टॉकीज सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे याचा मला खूप जास्त आनंद झाला आहे”.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. कान्स चित्रपट महोत्सवात हा सिनेमा २ वेळा दाखवण्यात आला होता. “कान्स चित्रपट महोत्सवात सिनेमा दाखवला जाणे ही एक आमच्यासाठी सुवर्ण संधी होती. यामुळे सर्वांचेच मनोबल वाढले. महाराष्ट्र सरकार मराठी सिनेमांना पाठिंबा देत असल्याने सकारात्मकता निर्माण झालेली आहे.” अशी भावना शरद केळकरने व्यक्त केली.”