लोकशाही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क देते आणि सरकारला प्रश्न विचारायला का घाबरायचं असा सवाल दिग्दर्शक अनुराग कश्यपने केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत एक ट्विट केलं होतं. माझ्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचं असा प्रश्न त्याने मोदींना केला होता. धमकीविरोधात पोलिसांकडे जाण्याऐवजी थेट मोदींना टॅग करून ट्विट केल्याबद्दल अनेकांनी अनुरागवर टीका केली होती.

‘लोकशाही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क देते. प्रश्न विचारल्याबद्दल जर मला घाबरवलं जात असेल आणि त्यानंतर अनेकांकडून टीका होत असेल तर मला नाही वाटत की हे वातावरण योग्य आहे,’ असं मत अनुरागने मांडलं. आगामी ‘गेम ओव्हर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात तो बोलत होता.

सरकारविरोधात बोलताना भीती वाटत नाही का असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला, ‘सरकारला प्रश्न विचारण्यासाठी का घाबरावं? मी धमक्यांना घाबरत नाही पण वडील म्हणून मला माझ्या मुलीची सुरक्षा अधिक महत्त्वाची वाटते. मी ज्यांना समर्थन देत नाही ते पंतप्रधान म्हणून निवडून आले तरी मला काही समस्या नाही. हा लोकांचा निर्णय आहे आणि ते मी मान्य करतो. मी नेहमीच सरकारविरोधात लढलोय.’ यावेळी त्याने काँग्रेस सरकार असताना त्याच्या चित्रपटांवरील बंदीचं उदाहरण दिलं.

‘मी पक्षाविरोधात लढत नाही तर सरकारविरोधात लढतो. मतमतांतरे असू शकतात. मी पंतप्रधानांच्या बाजूने नाही याचा अर्थ असा होत नाही की माझ्या विधानांमुळे ते निवडून येणार नाहीत. ते कधी समोर आले तर इतरांप्रमाणेच मी त्यांच्यासाठी आदराने उभा राहीन,’ असंही तो म्हणाला.

यावेळी अनुरागने ट्रोलिंगविरोधात सशक्त कायद्याची मागणी केली. सत्तेत असलेल्यांनी जर अशा ट्रोलिंगविरोधात परखड मत व्यक्त केलं तर त्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल असं तो म्हणाला.

मुलीला बलात्काराच्या धमकीप्रकरणी त्याने एफआयआर दाखल केला असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनुरागने आभारही मानले.