आजच्या काळात इतिहास हा विषय केवळ पाठ्यपुस्तक आणि परीक्षेचे पेपर यांपुरता मर्यादीत आहे. मात्र नवीन पिढीला आपल्या नेत्यांची आणि ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्राणाची बाजी लावली त्यांचे आयुष्य समजावे यासाठी काही खास उपक्रम करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत सोनी मॅक्स२ ने एका विशेष कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अजरामर लढा दाखविला जाणार आहे. “तुम मुझे खून दो, मैं तुम्ही आजादी दुंगा” हे वाक्य आजही प्रत्येकाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देतं. हे वाक्य नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी उच्चारलं होतं. अनेक भारतीयांमध्ये उत्साह संचारण्यासाठी आणि त्यांना स्वातंत्र्यासाठी प्राणांतिक लढ्याची प्रेरणा देण्यात नेताजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा संपूर्ण प्रवास नव्या पिढीला समजावा यासाठी हा कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येणार आहे.

येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत आपला ७१वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सोनी मॅक्स२ ही भारतातील आयकॉनिक हिंदी सिने वाहिनी ‘नेताजी सुभाष चंद्र बोस: द फरगॉटन हिरो’ हा कार्यक्रम दाखविणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४० वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होईल. भारतीय सिनेमातील उत्तम दिग्दर्शक मानल्या जाणाऱ्या श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. स्वातंत्र्याचा महत्त्वाचा स्तंभ मानले गेलेले नेताजी बोस यांचं आयुष्य, या लढ्यातील त्यांची भूमिका यांचा या सिनेमात वेध घेण्यात आला आहे. त्यांनीच भारतात ‘जय हिंद’चा नारा दिला. नाझी जर्मनीमध्ये नेताजींनी घालवलेली आयुष्यातील पाच वर्षे आणि आझाद हिंद सेनेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेल्या घटनांचा आढावा यात आहे. या सिनेमात त्यांचे महात्मा गांधींसोबत झालेले वाद आणि ब्रिटिशांच्या नजरकैदेतून त्यांनी कोलकात्याच्या आपल्या राहत्या घरातून जर्मनीला केलेले पलायन यांसारख्या घटनाही आहेत.