बॉलीवूडमध्ये ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच, त्याने या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम पूर्ण केल्याची माहिती ट्विटर या सोशल साइटवरून दिली. ‘रिलोड’ या अॅक्शनपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थ व्यतिरीक्त ‘रिलोड’ चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिचीदेखील मुख्य भूमिका आहे.

‘रिलोड’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केले आहे. दरम्यान, सदर चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शेवट अगदी दमदार पद्धतीने करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये सिद्धार्थच्या प्रेयसीची भूमिका साकारणा-या जॅकलीनने पोल डान्स करून चित्रिकरणाची सांगता केली. या चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘चंद्रलेखा’ असे बोल असलेल्या गाण्याचे मुंबईत चित्रिकरण झाले. सदर गाण्यासाठी नाइटक्लबचे वातावरण असणारा सेट उभारण्यात आला होता. रुपेरी पडद्यावर आपला पोल डान्स अधिक प्रभावी वाटावा यासाठी जॅकलीनने चित्रीकरणापूर्वी सदर नृत्यशैलीचे प्रशिक्षण घेतले. या गाण्यात जॅकलीन तिच्या मोहक अदांनी सिद्धार्थला घायाळ करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. ‘चंद्रलेखा’ या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन आदिल शेख याने केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आदिलला ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटातील ‘लडकी ब्युटीफुल कर गयी चुल..’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक विभागातील पुरस्कार देण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रिलोड’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, मिआमी आणि बँगकॉक येथे करण्यात आले आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, दर्शन कुमार यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेला रिलोड या वर्षी २५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.