बॉलीवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळाले आहे. पण, शाहरुख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे. बॉलीवूड लाइफ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात शुक्रवारपर्यंत ८१.८५ कोटी तर भारताबाहेर २२ कोटींची कमाई केली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी २’ हा ‘रईस’ आणि ‘काबिल’ या चित्रपटांना मागे टाकेल असे चित्र होते. मात्र, आता संपूर्ण चित्र पालटल्याचे दिसते. शाहरुख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ या चित्रपटांना मागे टाकण्यात ‘जॉली एलएलबी २’ ला अपयश आल्याचे बॉलीवूड लाइफ संकेतस्थळाने म्हटले आहे. ‘रईस’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात ११८.३६ कोटी रुपये इतकी कमाई केली होती. तर ‘काबिल’ने ८२.१८ कोटी इतकी कमाई केली होती. ‘काबिल’ आणि ‘रईस’ हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने त्यांच्यामध्ये बॉक्स ऑफिस कमाईसाठी चढाओढ  होती. पण, अक्षयच्या या चित्रपटासोबत कोणताच दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला नसतानाही त्याला फारसे चांगले यश मिळालेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ‘काबिल’ आणि ‘रईस’ला मिळालेल्या स्क्रिन्सच्या तुलनेत ‘जॉली एलएलबी २’ ला अधिक स्क्रिन्स मिळाल्या आहेत.

असे असले तरी अजूनही  ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. अर्थात प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्यावर प्रेमाचा वर्षावच त्या दिवशी केला होता असे म्हटले चुकीचे करणार नाही. कारण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चित्रपटाने तब्बल ९.०७ कोटींचा गल्ला कमविला होता. गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली होती. ‘जॉली एलएलबी २’ ने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमविला होता. चौथ्या दिवशी चित्रपटाने ५७.६१ कोटींचा गल्ला कमविलेला, तर मंगळवारी ९.०७ कोटी, बुधवारी ५.८९ कोटी, गुरुवारी ५.०३ कोटी कमविले. तर काल (शुक्रवार) द गाझी अॅटॅक हा चित्रपट प्रदर्शित होऊन देखील ‘जॉली एलएलबी २’ ने ४.१४ कोटींचा गल्ला जमविला. या चित्रपटाने शुक्रवारपर्यंत ८१.८५ कोटी इतकी कमाई केली होती.

सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटात अक्षय व्यतिरीक्त हुमा कुरेशी, अन्नु कपूर, यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये. लखनऊमधील रहिवासी जगदिश्वर मिश्र (अक्षय कुमार) याला वकिलीच्या करिअरमध्ये मोठं काहीतरी करायचं आहे. पण घरच्या स्थितीमुळे त्याला एका ज्येष्ठ वकिलाच्या कार्यालयात दुय्यम स्वरुपाचं काम करावं लागतं. पण त्याच्यातील जिद्द कायम आहे. लखनऊमधील न्यायालयात स्वतःच स्वतंत्र चेंबर असावं, अशी इच्छा त्याची असते. त्यासाठी लागणारा पैसाही त्यानं जमवलेला असतो. पण ऐनवेळी तो कमी पडतो. मग खोटं बोलून तो न्यायालयात त्याला रोज भेटणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका महिलेची फसवणूक करून तिच्याकडून पैसे घेतो. यानंतर काय घडते. त्यातून पुढे कथानकाला कशी वळणे मिळतात. खुद्द जगदिश्वर मिश्र याच्यावर काय काय संकटे कोसळतात… या सगळ्यातून ‘जॉली एलएलबी २’ची कथा पुढं जाते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.