महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका आजपर्यंत आलेली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे शिर्षक गीत बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक कैलाश खेरने गायले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा या मालिकेतून प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही, त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

‘गाथा नवनाथांची’ या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं हे आव्हानात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी विएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत विएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात गेला जातो. त्यामुळे या मालिकेतील विएफएक्स हा एक महत्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे. २१ जून पासून ही मालिका सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kailash kher sing gatha navnathanchi serial song avb
First published on: 19-06-2021 at 17:44 IST