कंगना रणौतच्या आगामी ‘सिमरन’ सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा टिझर पाहून तिच्या चाहत्यांमध्ये ‘सिमरन’ सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कंगनाच्या जबरदस्त अभिनय कौशल्याची झलक या सिनेमात पुन्हा एकदा पाहता येणार आहे. पण हा सिनेमा कंगनासाठी अजून एका कारणामुळे खास आहे. कारण या सिनेमासाठी कंगनाने लिखाणही केले आहे.

‘रंगून’नंतर कंगनाच्या या सिनेमाची सुरूवातही विवादानेच झाली आहे. सिमरन या सिनेमात कथा, संवाद आणि स्क्रिनप्ले लिहिण्यासाठी कंगनाच्या नावाला क्रेडिट दिले गेले आहे. सिनेमाचा लेखक अपूर्व असरानीने ट्विटवरून त्याला सिनेमाचा लेखक म्हणून पूर्ण श्रेय न दिल्याबद्दल नापसंती दर्शवली होती. पण अपूर्व आता कंगनाच्या खोटेपणावर फारच संतापला आहे. त्याने यासंदर्भात एक मोठी पोस्टच फेसबुकवर शेअर केली आहे.

‘सिमरन’ सिनेमाचा लेखक अपूर्व असरानीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, सिनेमाच्या पोस्टरमध्ये लेखक म्हणून त्याचे नाव कंगनानंतर लिहिले याचे त्याला वाईट वाटले नाही. पण कंगना तिच्या अनेक मुलाखतीत दिग्दर्शक हंसल मेहता तिच्याकडे फक्त एका ओळीचा स्क्रिनप्ले घेऊन आले होते, असे सांगत आहे. तसेच तिच्याकडे जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा डार्क थ्रिलर प्रकारात मोडणारा हा सिनेमा होता. पण तिने याचे लाइट कॉमेडी सिनेमात रुपांतर केले.

‘सिमरन’ हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे जो एका एनआरआय नर्स संदीप कौरच्या आयुष्याभोवती फिरतो. संदीपला गेल्यावर्षी बँकेत चोरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. संदीपने ही चोरी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी केली होती.

अपूर्वने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या सिनेमाच्या लेखनामध्ये पूर्ण माझी मेहनत आहे. मला माहिती आहे की मी असं बोललो तर तिचे लाखो चाहते माझ्यावर भडकतील. पण तरीही मला हे बोलावं लागणार. जे मला जाणतात त्यांना हे पुरेपूर माहिती आहे की मी नेहमी सत्याच्या बाजूनेच उभा राहतो आणि हे माझ्यासाठी कोणत्याही हिट सिनेमापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.

अपूर्वने त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं की, ‘सिमरन’ सिनेमासोबत तो पहिल्या दिवसापासून जोडला गेलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून सिनेमाची कथा तिच होती जी आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तसेच या पोस्टमध्ये दिग्दर्शक हंसल मेहता यांना उद्देशून म्हटले आहे की, मला आशा आहे की माझा मित्र हंसल खरं बोलण्याची हिंम्मत दाखवेल अशी अपेक्षा करतो. अपूर्व असरानीने याआधी अलीगढ, सिटीलाइट, शाहिद या सिनेमांचे लेखन केले आहे.