बॉलिवूड क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरवर पदार्पण केलं आहे. आतापर्यंत टीम कंगना रणौत या ट्विटर अकाऊंटवरुन कंगना तिचं मत मांडत होती. मात्र आता कंगनाने स्वत:च नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन तिने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खास मेसेज देत त्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी नेटकऱ्यांनी जी एकजुटीची ताकद दाखवली ते पाहून कंगना भारावून गेली आणि म्हणूनच तिने ट्विटरवर पदार्पण केल्याचं म्हटलं आहे.

“सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण जग एकवटलं असून त्याला न्याय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाची ताकद काय असते हे मला सुशांत प्रकरणी कळली त्यामुळेच मी माझे विचार बदलले आणि ट्विटरवर पदार्पण केलं. सोशल मीडियामुळे मला अनेक नवीन आशा पल्लवित होताना दिसत आहेत. इतकंच नाही तर देशाच्या विकासात सोशल मीडियाची मुख्य भूमिका आहे”, असं कंगना म्हणाली.


पुढे ती म्हणते, “यापूर्वी मी कधीच सोशल मीडियावर थेट चाहत्यांशी संवाद साधत नव्हते. कारण मी चाहत्यांपासून किंवा नेटकऱ्यांपासून दूर असल्याचं मला कधी वाटलंच नाही. मी माझे विचार कायम चित्रपटांमधून व्यक्त करत होते. परंतु, आता मला सोशल मीडियाची ताकद लक्षात आली आहे. त्यामुळेच मी ट्विटरवर आले”.

दरम्यान, यापूर्वी टीम कंगना रणौत या ट्विटर अकाऊंटवरुन कंगनाची मतं मांडली जायची. परंतु, आता कंगनाने स्वत:च ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे.