बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. दरम्यान, ‘गॅंगस्टर’ या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाल्याने कंगनाने एक ट्वीट करत वडील आणि आजोबांसोबत असलेल्या तिच्या लढाईबद्दल सांगितलं आहे.

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. कंगनाचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “प्रत्येक पायरी म्हणजे माझे वडील आणि आजोबांपासून सुरु होणारी लढाई, ज्यांनी माझे आयुष्य हे दयनीय बनवले होते, आणि तरीही १५ वर्षांनंतर यशस्वी झाल्यानंतरही दररोज जगण्यासाठी लढाई करावी लागते परंतु पण हे योग्य आहे, यासाठी सगळ्यांचे आभार,” अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

‘गॅंगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘गॅंगस्टर’मध्ये कंगनाने सिमरनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासूने केले होते. या चित्रपटात कंगनासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता इम्रान हाश्मी आहे.

दरम्यान, कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘तेजस’ या चित्रपटात भारतीय वायु सेनेच्या पायलेटच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे.