‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे १२ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांना मालामाल करणाऱ्या या स्पर्धेची नोंदणी देखील सुरु करण्यात आली आहे. या रिअ‍ॅलिटी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना २५ जूनपासून ३ जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल.

सोनी लिव्ह या ट्विटर हँडलवर अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करुन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक ट्विस्ट टाकला जातो. कधी बक्षिसाची रक्कम वाढवली जाते, तर कधी प्रेक्षकांना नवी लाईफलाईन दिली जाते. असाच एक नवा प्रयोग याही वेळेस ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये करण्यात आला आहे. यावेळी केवळ ‘सोनी लिव्ह’ अ‍ॅपवरुन रजिस्ट्रेशन करणाऱ्याच स्पर्धकांना या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

२५ जूनपासून ३ जुलैपर्यंत ‘सोनी लिव्ह’ या अ‍ॅपद्वारे इच्छूकांना रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुरुवातीला काही प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यावी लागतील. त्यानंतर स्पर्धकांचे डिजिटल ऑडिशन केलं जाईल. या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालेल्या स्पर्धकांना मुख्य शोमध्ये भाग घेऊन आपलं नशीब आजमवण्याची संधी मिळेल.