छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही रिअ‍ॅलिटीशोला १३ व्या पर्वामध्ये बुधवारी एका स्पर्धाने चुकीचं उत्तर दिल्याने त्याला थेट ९ लाख ३० हजारांचा फटका बसला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत बुधवारी हॉट सीटवर मूळचे कानपूरचे असणारे मात्र सध्या मुंबईत वास्तव्यास असणारे अशुतोष शुक्ला खेळत होते. ३५ वर्षीय अशुतोष मागील २० वर्षांपासून केबीसीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर बुधवारी त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. मात्र या स्वप्नाचा शेवटं म्हणावा तसा गोड झाला नाही.

नक्की वाचा >> KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर

अशुतोष हे स्वत: एका बँकेत नोकरी करतात आणि कामानिमित्त ते मुंबईत राहतात. त्यांची पत्नी सुद्धा लखनऊमध्ये बँकेत काम करते तर त्यांचे आई-वडील हे कानपूरला राहतात. अशुतोष यांना एक चार वर्षाची मुलगीही आहे. अशुतोष यांनी कार्यक्रमामध्ये आपल्या मुंबईतील वास्तव्यासंदर्भात माहिती देताना तीन मित्रांसोबत बॅचर्स पद्धतीने राहत असल्याचं सांगितलं. अशुतोष यांनी अगदी उत्तम पद्धतीने खेळत १२ लाख ५० हजारांपर्यंत मजल मारली मात्र त्यानंतर एका चुकीच्या प्रश्नामुळे ते केवळ ३ लाख २० हजार रुपयेच जिंकू शकले.

अशुतोष यांनी सर्वता आधी आपली ५०-५० ही लाइफलाइन वापरली. सहाव्या प्रश्नालाच त्यांनी ही लाइफलाइन वापरुन २० हजार रुपये जिंकले. त्यानंतर त्यांनी आपली दुसरी लाइफलाइन वापरुन ४० हजारांपर्यंत मजल मारली. एक्स रेमध्ये एक्स काय असतं या प्रश्नासाठी त्यांनी प्रेक्षकांची मदत घेतली म्हणजेच ऑडियन्स पोल ही लाइफलाइन वापरली. त्यानंतर अशुतोष यांनी आपली फ्लिप द क्वेशन ही लाइफलाइन वापरली. १२ व्या प्रश्नाला त्यांनी आस द एक्सपर्ट लाइफ लाइन वापरुन १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. मात्र १३ व्या प्रश्नाचं म्हणजेच २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देताना अशुतोष चुकले आणि ते १२ लाख ५० वरुन थेट ३ लाख २० हजारांवर आले. अशुतोष यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तर जाणून घेऊयात.

 

प्रश्न : खालीलपैकी व्हाइट गोल्ड असं कोणत्या पिकाला म्हणतात?

पर्याय : सोयाबीन, राजमा, कापूस आणि दुधी

उत्तर : कापूस

प्रश्न : एक्स रे मधील एक्सचा अर्थ काय

पर्याय : एक्सनॉन, अननोन, इललिलग, रेडिएशन

उत्तर : अननोन

प्रश्न : आय एम नॉट मसिहा हे पुस्तक कोणाच्या आठवणींसदर्भात आहे?

पर्याय : श्रीनिवास बी. व्ही, सोनू सूद, कमाल हसन, गौतम गंभीर</p>

उत्तर : सोनू सूद

प्रश्न : मार्च २०२१ मध्ये एन्गोझी ओकोन्जो इवेआला या कोणत्या संस्थेच्या पहिल्या आफ्रिकन निर्देशक पदी विराजमान झाल्या?

पर्याय : वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड

उत्तर : वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन

प्रश्न : लिकूड, याश अतिद आणि न्यू राइट हे कोणत्या देशातील राजकीय पक्ष आहेत?

पर्याय : ब्राझील, पोर्तुगाल, फिलिपाइन्स, इस्रायल

उत्तर : इस्रायल

कोणत्या प्रश्नाला अशुतोष चुकले?

या खेळामधील १३ वा प्रश्न म्हणजेच २५ लाखांसाठी अशुतोष यांना भारतीय रेल्वेसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. नैतिकतेच्या आधारावर भारताच्या कोणत्या रेल्वेमंत्र्यांनी घैसाल रेल्वे अपघातानंतर राजीनामा दिलेला?, हा प्रश्न २५ लाखांसाठी विचारण्यात आलेला. या प्रश्नाला पर्याय म्हणून लाल बहादूर शास्त्री, सी. के. जाफर शरीफ, नितिश कुमार आणि ललित नारायण मिश्रा असे पर्याय देण्यात आलेले. आपण यासंदर्भात वाचलं असल्याचं सांगत अशुतोष यांनी पहिला पर्याय म्हणजेच लाल बहादुर शास्त्री हे उत्तर लॉक करण्यास सांगितलं. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला तेव्हा शास्त्रीजी रेल्वेमंत्री होते हे मी वाचल्याचं अशुतोष यांनी सांगितलं. मात्र त्यांनी दिलेलं हे उत्तर चुकीचं ठरलं. घैसाल येथील अपघात हा १९९९ साली झाला होता. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये हा अपघात झालेला. त्यावेळी सध्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केंद्रीय रेल्वेमंत्री होते.

कसा झालेला हा अपघात?

२ ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातामध्ये अवध आसाम एक्सप्रेस आणि ब्रम्हपुत्रा मेल या दोन रेल्वे गाड्या समोरासमोर धडकलेल्या. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झालेला. अपघात झाला तेव्हा दोन्ही गाड्यांमध्ये एकूण अडीच हजार प्रवासी प्रवास करत होते. पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरमधील घैसाल रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात २९० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आणि त्यानंतर झालेल्या टीकेमुळे नितीश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. अशाप्रकारे नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देणारे ते लाल बहादूर शास्त्रीनंतरचे एकमेव रेल्वेमंत्री ठरले होते.