चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य करणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर अभिनेत्री क्रिती सनॉन, स्वरा भास्कर, पूजा बेदी भडकल्या. “मी फक्त एक आमदार नाही तर चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात”, असं वक्तव्या बलियाचे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं होतं. तर हीच मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं म्हणत अभिनेत्रींनी तीव्र संताप व्यक्त केला.

‘मुलींना बलात्कार कसा होऊ नये हे शिकवा? त्यांना स्वत:ला तरी कळतंय का की ते काय बोलतायत? हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. संपूर्ण परिस्थितीच गोंधळलेली आहे. ते त्यांच्या मुलांना संस्कार का देऊ शकत नाहीत?’, असा संतप्त सवाल क्रिती सनॉनने केला. तर स्वरा भास्करने सुरेंद्र सिंह यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. त्यात ते उन्नाव बलात्कार प्रकरणावर भाष्य करताना दिसत आहेत. ‘ये घटिया आदमी पुराना पापी है’, असं म्हणत स्वराने त्यांच्यावर टीका केली.

सुरेंद्र सिंह यांच्यासारख्या पुरुषप्रधान वेडेपणाला पक्षातून काढून भाजपाने पक्ष स्वच्छ करण्याची वेळ आली आहे, असं अभिनेत्री पूजा बेदीने म्हटलं.

“गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे”, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.