करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेउद्योग पार ठप्प झाला आहे. सिनेमागृहांमध्ये कुठलाही चित्रपट प्रदर्शित होण्यास निर्बंध आहेत. परिणामी अनेक चित्रपटांनी आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग स्विकारला आहे. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाचं नाव जोडलं गेलं आहे. ‘लाल बाजार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता अजय देवगणने या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला. आश्चर्याची बाब म्हणजे काही तासांमध्ये हा ट्रेलर सहा लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

‘लाल बाजार’ हा एक क्राईम, थ्रिलर चित्रपट आहे. कोलकत्तामध्ये शरीर विक्री करणाऱ्या महिलांच्या खूनाचे सत्र सुरु होते. खून ज्या ठिकाणी होतात त्या भागाला लोक लाल बाजार म्हणून ओळखतात. आता हे खून कोण करतय? का करतय? या खूनांमध्ये कोणा सिरिअल किलरचा हात आहे का? या प्रश्नांची उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत. हा एक सस्पेन्सने भरलेला चित्रपट असेल अशी चर्चा सुरु आहे.

अजय देवगणने या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली आहे. “बिनधास्त आणि कोणालाही न घाबरणाऱ्या गुन्हेगारांना लाल बाजारमधील पोलीस वठणीवर आणतील.” अशी कॉमेंट चित्रपटाच्या ट्रेलरवर केली आहे. लाल बाजार येत्या १९ जूनला झी ५वर प्रदर्शित होणार आहे.