नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटात आणखी एक अभिनेता असल्याचे समोर आले. या अभिनेत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हा अभिनेता म्हणजे शरद केळकर. त्याने या चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचे म्हटले आहे. पण चित्रपटातील शरद केळकरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे दिसत आहे. अनेकांनी ट्विटरवर शरद केळकरच्या लक्ष्मी या भूमिकेतील फोटो शेअर करत त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. एकीकडे लोकांनी अक्षय कुमारच्या अभिनयाला ओवर अॅक्टींग म्हटले आहे तर दुसरीकडे शरद केळकरची भूमिका डोक्यावर उचलून धरली आहे.

नेटकऱ्यांनी शरद केळकरच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. शरद हा काही ठरावीक चित्रपटच करतो पण त्याचा अभिनय अतिशय सुंदर असतो असे एका यूजरने म्हटले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक संकटाचादेखील सामना करावा लागला. या चित्रपटावर लव्हजिहाद, धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यासोबतच या चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आले होते.