हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमनचा ‘लोगन’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ह्यूला वाटते की बॉलिवूडच्या बादशहाने म्हणजे शाहरुखने वूल्वरीनची व्यक्तिरेखा साकारावी. गेल्या १७ वर्षांपासून चाललेल्या या ‘एक्स मेन’च्या मालिकेत आता लोगन म्हातारा झालेला दाखवला आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनवेळी आता वूल्वरीनची ही मालिका तो कशाप्रकारे पुढे नेऊ इच्छितो? प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ह्यू म्हणाला की, ‘पुन्हा ही व्यक्तिरेखा मला साकारायला काही हरकत नाही. पण आता ही व्यक्तिरेखा दुसऱ्यांनीही साकारावी असे मला वाटते. शाहरुख ही व्यक्तिरेखा चांगल्याप्रकारे निभाऊ शकतो असे मला वाटते.’

पण आता शाहरुखला ही व्यक्तिरेखा साकारायला आवडेल का? पण सर्वात आधी शाहरुखला छातीवरचे केस वाढवावे लागतील आणि मग ‘एक्स मेन’ सिनेमाच्या मालिकेत काम करण्याचा विचार करावा लागेल असं आम्ही नाही खुद्द शाहरुखच म्हणतो आहे. एका चाहतीने ट्विटरवर वूल्वरीनची व्यक्तिरेखा शाहरुखने करावी असे ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला शाहरुखने अगदी त्याच्या खास शैलीत उत्तर दिले. शाहरुख म्हणाला की, ‘वूल्वरीन साकारण्यासाठी छातीवर केस असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रयत्नही सुरु केले आहेत. वूल्वरीन आणि ह्यू दोघंही मला आवडतात.’

शुक्रवारी, ३ मार्चला प्रदर्शित झालेला ‘लोगन’ हा सिनेमा वूल्वरीन मालिकेतील शेवटचा सिनेमा आहे. त्यामुळे ह्यू जॅकमन आणि वूल्वरीनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खासच आहे. या सिनेमाची कथा ओल्ड मॅन लोगन या विनोदी पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमात लोगनची शेवटची लढाई दाखवण्यात आली आहे. म्यूटंट्सची हत्या केली जाते आणि वूल्वरीनला त्याच्यासारखीच एक ‘एक्स २३’नावाचीमुलगी भेटते.

‘लोगन’ला अमेरिकेत आर रेटिंग देण्यात आले आहे. याआधी ‘एक्स मेन’ या सिनेमाच्या सर्वच भागांना पीजी १३ हे रेटिंग देण्यात आले होते. आर रेटिंगचा अर्थ आधीच्या भागांपेक्षा या भागात जास्त प्रमाणात हिंसा आणि रक्तपात दाखवण्यात आला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन ह्यूला क्रिकेटचे फार वेड आहे. सध्या सुरु असलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबद्दल भारतीय संघाचे मनोबळ उंचावण्यासाठी त्याने एक खास व्हिडिओ शूट केले होते.