News Flash

सोडरबर्गचा आयफोनपट

स्टीव्हन सोडरबर्ग या अमेरिकी चित्रकर्त्यांने २०१३ साली चित्रपट बनविण्यातून जाहीरपणे स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.

सोडरबर्गचा आयफोनपट

|| पंकज भोसले

स्टीव्हन सोडरबर्ग या अमेरिकी चित्रकर्त्यांने २०१३ साली चित्रपट बनविण्यातून जाहीरपणे स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. हॉलीवूडमध्ये दिग्दर्शकांना मिळणारी वागणूक, दर्शकांच्या मोठय़ा वर्गाचे छोटय़ा पडद्यावरच्या मालिकांकडे वळण्याचा ओघ आदी कारणांनी सिनेमा बनविण्यात राम न राहिल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता. ‘साइड इफेक्ट’ या वैद्यकीय क्षेत्रावरच्या थ्रिलरनंतर सिनेमा करणार नाही, ही घोषणा करणाऱ्या सोडरबर्गने निर्मातेपदापासून वेगवेगळ्या भूमिकांत शिरत टीव्ही आणि मोठय़ा पडद्यावर येणाऱ्या सिनेमांत सहभाग ठेवला होता. पण  गेल्या वर्षी ‘लोगन लकी’ हा चित्रपट करून निवृत्ती उपवास सोडल्यानंतर पुन्हा सोडरबर्ग चित्रपट दिग्दर्शनात सक्रिय झाला असून त्याच्या प्रयोगी चित्रपटांची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना तो मोठा दिलासा आहे.

अमेरिकी इंडिपेण्डण्ट सिनेमाच्या चळवळीचा आरंभ सोडरबर्गच्या  ‘सेक्स लाइज अ‍ॅण्ड व्हिडीओटेप’द्वारे झाला. सोडरबर्ग व्यावसायिक आणि समांतर या चित्रपटांच्या सीमारेषांवर कधीच नव्हता. तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याचा पार खोलवर वावर राहिला. म्हणजे ‘एरिन ब्रोकोविच’ हा व्यक्तिलढय़ाची गोष्ट सांगणारा सामाजिक सिनेमा काढून झाल्यानंतर त्याच्या सिनेयादीत स्मार्ट बँक दरोडय़ाचा ओशन मालिकेतील निव्वळ ब्लॉकबस्टर सिनेमा दिसू शकतो. अमेरिकेत २००८ साली आलेल्या मंदीच्या रोडरोलरखाली कित्येक आर्थिक संस्था पिचल्या गेल्या आणि त्यावर साहित्य-सिनेमा-माहितीपटांचा पाऊस पडायला लागला. सोडरबर्गने ‘गर्लफ्रेण्ड एक्सपीरिअन्स’द्वारे मंदीकाळातील भलत्याच जगाचे चित्रण एका पोर्नस्टारला प्रमुख अभिनेत्रीपदी बसवून केले.  मनसंघर्ष, पैसासंघर्ष, सत्तासंघर्ष, बडय़ा संस्थांकडून समाजातील व्यक्तींना वेठीस धरण्याचे सत्र या काही मूलभूत संकल्पनांवरच शैलीदार सिनेमा बनविणाऱ्या सोडरबर्गने या वर्षी आयफोन सेव्हनवर संपूर्ण सिनेमा चित्रित करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

आयफोनवर चित्रित झालेला सोडरबर्गचा ‘अनसेन’ हा काही पहिलाच सिनेमा नाही. दक्षिण कोरियाई दिग्दर्शक पार्क चान वुक याने २०११ सालीच आयफोनवर चित्रपट चित्रित केला होता. त्यानंतर जगभरामधील छोटय़ा-बडय़ा दिग्दर्शकांना आयफोनवर सिनेमा करण्याचे खूळ लागले होते. या दरम्यान वाढत चाललेल्या आयफोनधारी पिढीने समाजमाध्यमांवर व्हिडीओ अपलोड करण्याची दीक्षा घेत अतिवास्तववादी सिनेमांचे दिग्दर्शकत्व भूषविले. आज कुणीही आपला सिनेमा वितभर मोबाइलने बनवू शकतो. सोडरबर्गला या माध्यमाची ताकद आणि मर्यादा या दोहोंची तीव्र जाणीव असल्याने त्याने मोबाइलचा वापर एका उत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर बनविण्यासाठी केला आहे.

अनसेन चित्रपटामध्ये सॉयर (क्लेअर फॉय) नावाची तरुणी आपले घर आणि आई यांच्यापासून शेकडो मैल दूरच्या शहरामध्ये नोकरीनिमित्ताने राहण्यास आली आहे. अल्पावधीतच तिचा वरिष्ठ अधिकारी तिच्या कामावर खूश झालेला असतो आणि नव्या शहरात एकटेपणाखेरीज तिचे तसे सगळे बरे चाललेले असते. पण तिच्या शहरगावात दोन वर्षे तिचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या आणि मोबाइलवरून तिला प्रेमसंदेश धाडत छळणाऱ्या व्यक्तीची दहशत तिच्या मनात घर करून असते. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच बरे चाललेले सॉयरचे आयुष्य नव्याने बिघडते. पूर्वीच्या शहरामध्ये पाठलाग करणारी व्यक्ती अचानक तिच्या ऑफिसमध्ये दाखल झालेली तिला दिसते. इतरही काही ठिकाणी त्याचा वावर अनुभवल्यानंतर तिच्या दैनंदिन जगण्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. ती बिथरल्यासारखी वागू लागते. तिचे मन अस्थिर बनते. त्यावर उपाय म्हणून ती समुपदेशन केंद्राचा आधार घेऊ पाहते. इंटरनेटवरून शोध घेत एका मनोरुग्णालयातील तज्ज्ञांना भेटायला जाते. तिथे गेल्यानंतर मात्र थोडय़ाच वेळात तिच्या इच्छेविरोधात तिला मनोरुग्णालयात इतर रुग्णांसोबत डांबण्यात येते.  मी मनोरुग्ण नसून इथे निव्वळ सल्ला घेण्यासाठी आल्याचा तिचा धोषा कुणी ऐकून घेत नाही आणि तिने केलेल्या आक्रमक विरोधाच्यानिमित्ताने तिची सुटायची शक्यता अवघड बनते.

सॉयरसाठी मनोरुग्णालयात बंदी बनण्याहूनही वाईट गोष्ट ही असते, की तिचा पाठलाग करणारा माथेफिरू या रुग्णालयातच कर्मचारी म्हणून तिच्या समोर येतो. हा माथेफिरू तिला खरोखरीची मनोरुग्ण बनविण्यासाठी वाटेल त्या क्लृप्त्या करायला लागतो आणि सॉयरची मनअधोगती वाढायला लागते.

चित्रपट पारंपरिक सुटकापट नाही किंवा एककल्ली अन्यायपटही नाही. सॉयरला दिसणारी व्यक्ती खरी की खोटी याचे स्पष्टीकरण चित्रपटभर मिळत नाही. पण यानिमित्ताने रहस्यरंजनाची उत्तम मैफल सोडरबर्गने मांडली आहे. मनोरुग्णालयांची खंडणीखोरीची पांढरपेशी दरोडेखोरीही चित्रपटामधून स्पष्ट होते. वर एका चांगल्या सायकोलॉजिकल थ्रिलरचा अनुभवही मिळतो. आयफोन सेव्हन या एवढय़ाशा आयुधावर वाटेल ते शूट कुणीही करू शकतो. पण गंभीर आणि रंजक सिनेमा कसा बनवावा याचा वस्तुपाठ सोडरबर्गच देऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 2:18 am

Web Title: logan lucky
Next Stories
1  ‘सवेरेवाली गाडी’ झगमगाटी विश्वाची अंधारी बाजू
2 भटक्या मार्कोची कथा
3 रॉबर्ट डी नीरोंची ट्रम्प यांच्यावर शिव्यांची बरसात
Just Now!
X