|| रवींद्र पाथरे

सांध्यवेळ. आसमंतात पावसाळी कुंद जडत्व. गेले दोन-तीन दिवस पावसानं थैमान घातलेलं. आज मात्र त्याने काहीसा विलंबित ख्याल लावलेला. अशा वातावरणात अभिनेते नासिरुद्दीन शाह यांना भेटायचं होतं. त्यांच्या ‘मोटली ग्रुप’च्या चाळीशीनिमित्तानं. गेली ४० वर्षे वैविध्यपूर्ण नाटकं आणि समांतर चित्रपट चळवळीचा दौर त्यांनी अनुभवलेला. नव्हे, ते या प्रवासाचे अभिन्न अंगच होते. साहजिकच बरंच संचित त्यांच्याकडे साठलेलं. त्यांच्याशी गप्पा मारताना या सगळ्या पैलूंना स्पर्श होणं स्वाभाविकच. या गप्पांच्या दुसऱ्या दिवसापासूनच संस्थेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नाटय़महोत्सव सुरू होणार होता. तरीही ते अत्यंत शांत, कसलंही टेन्शन नसल्यासारखे दिसत होते. बैठकीची प्रशस्त खोली साधीच. मध्यमवर्गीय कलाभिरुची सांगणारी. हिंदी फिल्म अभिनेत्याची वलयांकित झकपक औषधालाही नव्हती. खोलीत त्यांचे विविध भूमिकांतले फोटो. त्यांची कुणी कुणी काढलेली चित्रं. व्यंगचित्रं. त्यांनी हसून केलेल्या दिलखुलास स्वागताने औपचारिक ओळखीचीही गरज पडली नाही. आणि गप्पांची मैफल याच सुरात रंगत गेली..

  • तुम्ही ४० वर्षांपूर्वी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली त्यावेळचा माहोल आणि आज यांत तुम्हाला काय फरक जाणवतो?

खूपच. मुळात १९७८ साली मी आणि बेंजामिन गिलानी आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं करायचं म्हणून ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक करायचं ठरवलं. तेव्हा आमची स्वत:ची संस्थाही नव्हती. पण काही अडचणींमुळे प्रत्यक्षात हे नाटक रंगभूमीवर यायला वर्ष- सव्वा र्वष लागलं. ‘गोदो’चा पहिला प्रयोग आम्ही ओम पुरींच्या संस्थेच्या बॅनरखाली केला. नंतर मात्र आम्ही ‘मोटली’ची स्थापना केली. कमीत कमी खर्चात नाटक करायचं, हे आधीच ठरलेलं. कारण पैसा होता कुणाकडे? पण नाटक करायची खाज होती.. जी बहुतेक नाटकवाल्यांमध्ये असतेच. त्याशिवाय अनंत अडचणींवर मात करून नाटकं केली गेलीच नसती. त्यावेळी मुंबईत पृथ्वी थिएटर किंवा एनसीपीएचं थिएटर नव्हतं. पं. सत्यदेव दुबे आणि ‘इप्टा’वगळता हिंदी नाटकं कुणी फारसं करतही नव्हतं. अर्थात त्यापूर्वीही पृथ्वीराज कपूर यांचा अपवाद करता हिंदी नाटकं करणारं कोण होतं?

आम्ही तेव्हा छबिलदासमध्ये नाटकं करत असू. आम्ही जी नाटकं करत असू त्याला १५-२० प्रेक्षक आले तरी डोक्यावरून पाणी अशी परिस्थिती होती. पण आम्ही कधी नाउमेद झालो नाही. कारण थिएटरची नशा आमच्यावर स्वार होती. मराठीत विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, दीपा श्रीराम यांच्यासारखी मंडळी तेव्हा सक्रीय होती. तुटपुंज्या पैशांत नाटकं करावी लागत. मात्र, त्यावेळचा प्रेक्षक हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुजाण आणि दर्दी होता. त्यांच्या जीवावरच आम्ही नाटकं करीत होतो. पैशाचं सोंग आणता येत नसल्याने स्वाभाविकपणेच ती कमीत कमी पैशांत करावी लागत. त्यामुळे नेपथ्यापासून सगळ्या गोष्टी जमेल तितक्या कमी पैशांत.. शक्यतो फुकटच आपसातच गोळा करीत असू. नाटकातून पैसा मिळण्याची शक्यता तेव्हाही नव्हती.. आजही नाहीए. पण आज एक मोठा बदल झालाय. कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपमुळे नाटक करणं आता तितकं कठीण राहिलेलं नाही. कॉर्पोरेट सेक्टर थिएटर में इंटरेस्ट ले रही है. यह अच्छा है या बुरा.. मैं नहीं कह सकता. पण त्यामुळे आज लखनौ, बरैली, कानपूरसारख्या ठिकाणी- जिथं नाटकाचं वातावरणच नाही- नाटकं करणं आम्हाला शक्य होतंय. तरुण पिढी आता नाटकाकडे वळू लागलीय. तरुण प्रेक्षकांचा हा वाढता प्रतिसाद निश्चितच सुखावणारा आहे. पृथ्वी थिएटर, एनसीपीएसारखी प्रेक्षागृहे आज उपलब्ध आहेत. नाटकं करायला तेव्हापेक्षा पोषक वातावरण आहे आज.

  • आर्थिक चणचणीमुळे नाटकाच्या सर्जनावर मर्यादा येत नाही का? एखादा विषय भव्यदिव्य निर्मितीची मागणी करणारा असेल तर तो पैशाअभावी करणं टाळलं गेलं.. असंही झालं असेल.

मला तसं वाटत नाही. भव्यदिव्य, नेत्रदीपक नाटकं पाश्चात्त्य रंगभूमीवर होताना दिसतात. आम्हीही ‘ज्युलिअस सीझर’ हे भव्यदिव्य नाटक एनसीपीएच्या सहकार्याने एकदा केलं होतं. पण त्यात आम्ही अपयशी ठरलो. पाश्चात्त्य रंगभूमीवर गाजलेल्या चित्रपटांवरूनही नाटकं केली जातात. ‘टायटॅनिक’ वगैरे. आपल्याकडेही ‘मुघल-ए-आझम’सारखं गाजलेल्या चित्रपटावर आधारित नाटक सादर केलं गेलं. ते वेगळेपणामुळे चाललंही. परंतु चित्रपटावरून केल्या गेलेल्या नाटकांत कसली आलीय सर्जनशीलता? त्यापेक्षा मूळ चित्रपट पाहणं जास्त योग्य.. नाही का?

  • तुम्ही प्रारंभीची पंचवीसेक र्वष इंग्रजी नाटकं केलीत. त्यानंतर जी हिंदी नाटकं सादर केली ती ईस्मत चुगताई, सआदत हसन मंटो, प्रेमचंद आदींच्या कथांवर आधारित. असं का?

हिंदीत मूळात नाटककारच नाहीत, तर आम्हाला स्क्रिप्ट कुठून मिळणार? मोहन राकेश, धर्मवीर भारती यांच्यानंतर हिंदीत नाटककारांची पिढी जन्मालाच आली नाही. अर्थात त्याला अनेक कारणं आहेत. चित्रपटाच्या जन्मामुळे हिंदी रंगभूमीने राम म्हटलं. उत्तम साहित्यिक, कलाकार, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक वगैरे सारे चित्रपटांकडे वळले आणि हिंदी रंगभूमीचा अंत झाला. हिंदीत नाटकंच लिहिली जात नसतील तर ती करणार कोण आणि कशी? आणि नाटकंच होत नाहीत म्हटल्यावर प्रेक्षकवर्ग तरी कसा निर्माण होणार? स्वाभाविकपणेच आम्ही हिंदीतल्या सशक्त कथाकारांकडे वळलो. त्यांच्या कथांवर आधारित नाटकं करू लागलो. या लेखकांच्या कथाच इतक्या नाटय़पूर्ण आहेत, की त्यांचं वेगळं नाटय़रूपांतर करण्याची आम्हाला गरज भासली नाही.

अर्थात असं जरी असलं तरी अलीकडच्या काळात ‘रायटर्स ब्लॉक’सारख्या उपक्रमांतून तरुण नाटय़लेखनाकडे वळू पाहत आहेत. त्यांचं लेखन फार चांगलं नसलं तरी एका पिढीनंतर तरी हिंदीत नाटककार निर्माण होतील अशी मला आशा आहे.

  • एनएसडीसारख्या नाटय़प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांतून नाटय़लेखनाचे धडे दिले जात नाहीत का?

बिलकूल नाही. असा काही विषय एनएसडीत शिकवला जात नाही. किमान संहितेचं रसग्रहण, विश्लेषण वगैरे तरी तिथे शिकवलं जायला हवं असं मला वाटतं.

  • पुण्याच्या ‘ललित कला केंद्रा’त नाटय़लेखन हा विषय आहे..

त्याचं कारण सतीश आळेकरांसारखे जानेमाने लेखक तिथे प्रमुख होते.

  • विषय निघालाच आहे तर एक विचारतो : नाटक हे माध्यम नाटककाराचं मानायचं की नटाचं? कारण यावर नेहमी वितंडवाद सुरू असतो. तुमचं याबद्दल काय मत आहे?

हे माध्यम निश्चितपणे नाटककाराचंच आहे. तोच नाटकाचा कर्ताधर्ता असतो. मुळात लेखकाने नाटक लिहिलंच नाही तर नट काय सादर करणार? एखादा विषय इम्प्रोव्हाइज करून करून किती करणार? हा.. आता जॉनी लिव्हरसारखं एखादा नट कॉमेडी सादरीकरण करेलही; पण त्याचा दर्जा काय असेल? आणि हे इम्प्रोव्हायझेशन कितपत ताणणार? त्यात ठोस कन्टेन्ट नको?

  • मराठी नाटक हे लेखककेन्द्री आहे. नाटकाचा विषय, आशय, फॉर्म तोच ठरवतो. परंतु राष्ट्रीय स्तरावर मराठी नाटकांना ‘व्हबरेज’ म्हणून हिणवलं जातं. तुम्हाला काय वाटतं?

मराठी रंगभूमीसारखी समृद्ध रंगभूमी देशात दुसरीकडे कुठेही नाही. नाटककारांच्या नवनव्या पिढय़ा इथे जन्माला येत असतात. त्यामुळेच मराठी रंगभूमीला पावणेदोनशे वर्षांची वैभवशाली परंपरा लाभू शकली आहे. मराठी रंगभूमी कधीच मरणार नाही. विजय तेंडुलकरांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाटककार तिने जन्माला घातले. रोज नवीन लेखक इथे जन्माला येताहेत. हल्लीच मी ‘सं. देवबाभळी’ हे नाटक पाहिलं आणि थक्कच झालो. मला फारसं मराठी येत नसल्याने त्यातले तपशील जरी माझ्यापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकले नाही तरी ‘असंही नाटक असू शकतं?’ असा प्रश्न मला पडला. मराठी नाटकाला ‘व्हबरेज’ म्हणून हिणवणाऱ्यांना नाटक म्हणजे काय, हेच कळलेलं नाही. ‘घाशीराम कोतवाल’ हे आजवर मी पाहिलेल्या देशीविदेशी नाटकांत मला सर्वश्रेष्ठ नाटक वाटतं. हे मी मनात कोणताही किंतू न येता मोठय़ा गर्वाने सांगू शकतो. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये ‘टोटल थिएटर’ आहे. मराठी नाटकांएवढं आशय-विषयांचं वैविध्य अन्यभाषिक नाटकांत कुठेच मी अनुभवलेलं नाही. एकेकाळी बंगाली रंगभूमी प्रगतीशील मानली जात होती. काही अंशी दक्षिणेत कर्नाटक व केरळमध्येही नाटकाची परंपरा आहे. परंतु मराठी रंगभूमीला तोड नाही. तिच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही.

  • प्रशिक्षित रंगकर्मी आणि अप्रशिक्षित रंगकर्मी यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

असा काही भेद मला बिलकूल मान्य नाही. प्रशिक्षणामुळे काही प्रमाणात तुम्हाला एक्स्पोजर मिळतं हे खरं. नाटकाबद्दलच्या काही गोष्टी कळतात. रंगभूमीबद्दलचं काहीएक भान येतं.. वगैरे मान्य. पण त्यापलीकडे त्याला जास्त महत्त्व नाही. विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, सुलभा देशपांडे, निळू फुले, भक्ती बर्वे हे रंगकर्मी कुठल्या स्कूलमध्ये शिकले होते? अमिताभ बच्चन, दिलीपकुमार कुठल्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये गेले होते? पण तरीही ते श्रेष्ठ कलाकार म्हणून घडलेच ना! याउलट, एनएसडीसारख्या संस्थेतून पासआऊट झालेले किती कलाकार उत्तम कलावंत म्हणून नावाजले गेलेत? अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतके! एनएसडीत गेले नसते तरीही ते उत्तम कलावंत झालेच असते.

  • परंतु डॉ. श्रीराम लागू यांनी एकदा म्हटलं होतं की, मी प्रशिक्षित असतो तर अनेक वर्षांच्या खडतर अनुभवांती  मला जे शिकायला मिळालं ते अधिक लवकर मला कळलं असतं..

यह उनकी विनम्रता है. त्यांनी अ‍ॅक्टिंगमध्ये जे साध्य केलंय तिथवर प्रशिक्षित नटांनाही पोचणं सोपं नाहीए. मी एनएसडीत असताना त्यांचं ‘आधे अधुरे’ पाहिलं होतं. त्याने मी इतका भारावून गेलो होतो की असं काम कधीतरी आपल्याला जमेल का, असा प्रश्न मला पडला होता. ‘सूर्य पाहिलेला माणूस’मधलं त्यांचं काम तर मी कधीच विसरू शकत नाही.

  • कलावंताची जडणघडण आणि तो ज्या अनुभवांतून गेला आहे त्याचं त्याच्या कलाकृतीत कधी प्रतिबिंब पडतं का? तुमचा काय अनुभव?

आपल्या जडणघडणीत कळत-नकळत जे संस्कार होतात त्याचं प्रतिबिंब कलेत नक्कीच पडत असणार. पण ते कसं काय रिफ्लेक्ट होतं, हे निश्चितपणे नाही सांगता येणार. कधी ते जाणिवेच्या पातळीवर असेल, तर कधी नेणिवेच्या. मी महात्मा गांधींवरचं नाटक करत असताना माझ्या त्या भूमिकेत माझ्या आईच्या एका परिचित स्त्रीचा भास होतो असं मला एकानं सांगितलं. कदाचित पूर्वी कधीतरी मी त्या वयस्क बाईंचं नकळत निरीक्षण केलेलं असेल. वृद्ध माणसाचं उठणं, बसणं, पोश्चर वगैरेचं. आणि गांधींची भूमिका करताना अभावितपणे ते त्यात उतरलं असणार. असं होऊ शकतं.

  • तुम्हाला अल्काझी आणि सत्यदेव दुबे यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले. त्यांच्याकडून तुम्ही काय घेतलंत?

अल्काझींकडून नाटकाचं डिटेलिंग कसं करावं हे मी शिकलो. त्यांची नाटकं लोकांच्या लक्षात राहत, परंतु त्यातल्या नटांचं काम मात्र दुर्लक्षिलं जाई. याउलट, अन्य फाफटपसाऱ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी हरकत नाही, पण नाटकातील कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोचवावा, हे दुबेजींकडून मला शिकायला मिळालं. दुबे स्वत: मात्र अत्यंत वाईट नट होते. परंतु नटांकडून आपल्याला हवं तसं काम कसं करून घ्यायचं याची त्यांना उत्तम नॅक होती. नाटकाशी कसलाही संबंध नसताना हिंदी सिनेमातील गाणी अकारण  ते वापरत. मला ते कदापि मान्य नाही. परंतु म्युझिक करण्यासाठी पैसे नसल्याने असेल कदाचित; त्यांनी असे उद्योग केले असावेत.

  • रंजनाची इतकी नवनवी माध्यमं दररोज येत असताना येत्या काळात नाटकाला भवितव्य आहे का?

नक्कीच. सिनेमा आणि टीव्ही आला तेव्हा आता नाटक मरणार असं म्हटलं जात होतं. परंतु त्यावेळीसुद्धा दुबे म्हणत, की टीव्हीवरचे घटिया कार्यक्रम बघून एके दिवशी लोक कंटाळतील आणि पुन्हा नाटकाकडे वळतील. ते पुढे खरं ठरलं. त्यामुळे नाटक कधीच मरणार नाही. नित्य नव्याला भिडणारी मराठी रंगभूमीला तर मरणच नाही.

  • पण याच दुबेजींनी ‘थिएटर मर चुका है’ असं ऐलान एकदा केलं होतं..

ऐसे सनसनीखेज स्टेटमेंट्स करते रहना यह उनकी आदत थी. फिर भी वे नाटक करतेही रहे..  कधीच संपू नयेत असं वाटणाऱ्या या गप्पांना नाइलाजानं कुठंतरी विराम देणं भाग होतं. परंतु गप्पा संपल्या तरीही त्याबद्दल कवी बोरकरांच्या शब्दांत म्हणायचं तर.. ‘अन् चित्रांची विचित्रवीणा अजुनि करते दिडदा दिडदा..’

भूमिकेत वाहवत जाणं अयोग्यच..

साकारलेल्या भूमिकांचं कलाकाराच्या प्रत्यक्ष जगण्यावर काही परिणाम होतात का? तर- नाही. निदान माझ्या बाबतीत तरी तसं कधी झालेलं नाही. ऐसा हुआ तो जिना मुश्कील हो जाएगा. कलाकारानं भूमिका करताना त्यात सर्वस्वानं एकरूप होणं खचितच योग्य नाही. आपण नाटक करतो आहोत याचं भान त्याने कायम  बाळगायला हवं. असं जर कुणी म्हणत असेल, की मी अमुक एका भूमिकेत स्वत:ला पूर्णपणे विसरून जातो, तर ते साफ चुकीचं आहे. कलाकाराला प्रयोगात प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं भान ठेवावंच लागतं. त्याला भूमिकेत वाहवत जाऊन चालणारच नाही. अन्यथा नाटकाचा बोजवारा उडेल. माझंच उदाहरण देतो. मी नाटकात गांधीजींची जी भूमिका करत असे, त्यात गांधीजी हरीलालचे वडील म्हणून आणि देशाचे नेते अशा भिन्न रूपांत समोर येत.  वाया गेलेल्या हरीलाल या मुलाच्या बाबतीत त्यांनी जो  निर्णय घेतला, तो मी माझ्या मुलाच्या बाबतीत घेऊ शकेन की नाही याबद्दल मला शंका आहे. गांधीजींनी परदेशी शिक्षणासाठी शिफारस करताना हरीलालऐवजी दुसऱ्या मुलाची निवड केली. मी त्यांच्या या कृतीवर जेव्हा विचार करत असे तेव्हा माझ्या वडलांनीही असंच केलं असतं असं मला जाणवलं. कारण मी हरीलालसारखाच होतो. परंतु एक वडील म्हणून मी मात्र माझ्या मुलाच्या बाबतीत गांधींसारखा वागू शकलो असतो का याची खात्री मी देऊ शकत नाही. एक मात्र झालं- या नाटकामुळे मी माझ्या वडलांना थोडंफार समजून घेऊ शकलो.

अभिनेते नासिरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’ या नाटय़संस्थेला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रंगभूमीवरील त्यांचा प्रवास आणि एकूणच रंगकार्यासंबंधीची त्यांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा..

ravindra.pathare@expressindia.com