मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर अर्थात छायाचित्रणकार म्हणून ओळख असलेला महेश लिमये आता ‘यलो’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारीही महेशने सांभाळली आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना पहिल्यांदाच महेशचा ‘डबलरोल’ पाहायला मिळणार आहे.  
‘उत्तरायण’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ आदी मराठी तर ‘कॉर्पोरेट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘दबंग’, ‘दबंग-२’ अशा हिंदी चित्रपटासाठी महेशने छायाचित्रणकार (कॅमेरामन) म्हणून आजवर काम केले आहे. ‘यलो’ चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.
रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकुर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा अंबर हडप, गणेश पंडित आणि क्षितीज ठाकुर यांची असून गुरू ठाकूर यांच्या गीतांना कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले आहे. उपेंद्र लिमये व मृणाल कुलकर्णी चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. महेशच्या या नव्या भूमिकेसाठी प्रेक्षकाना २८ मार्च पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.