सआदत हसन मंटो असं नाव घेतलं की अनेकांच्याच डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या म्हणजे त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या काही अद्वितीय कथा आणि त्यांचं साहित्य. एका लेखकाची लेखणीही शस्त्राइतकीच प्रभावी आणि वेळीस बोचरी असते हे त्यांच्या लेखणीतून वेळोवेळी सिद्ध झालं. समाजातून जाणिवपूर्वक वगळल्या जाणाऱ्या विषयांना हात घालत त्या विषयांवर आपल्या शब्दांतून वक्तव्य करणाऱ्या मंटो या महान लेखकाच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मंटो’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
जवळपास अडीच मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना या चित्रपटात ‘मंटो’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयावर नजरा खिळून राहतात. आपल्या आजुबाजूला होणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी मंटो यांचं असणारं मत आणि त्यावेळी समाजातून त्यांना झालेला विरोध, कुटुंबियांची त्यांच्याविषयीची मतं या सर्व गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
वाचा : सारा अली खानचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
‘गुलाम थे तो आजादी का ख्वाब देखते थे, आजाद हुए तो….’, ‘आखिर मे अफसाने ही रह जाते है और उनके किरदार…’, ट्रेलरमधील अशी सुरेखं वाक्य काळजाचा ठाव घेत आहेत. त्याशिवाय मंटो हे कोडं नेमकं आहे तरी काय हे उलगडण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांमध्येही बरंच कुतूहल निर्माण करुन जात आहे. नंदिता दास दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीनसोबतच रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, दिव्या दत्ता आणि ऋषी कपूर यांच्याही भूमिका आहेत. २१ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.