‘दिल दोस्ती दुनियादारी’ असो, ‘फास्टर फेणे’ असो किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडणार अभिनेता म्हणजे अमेय वाघ. नाटक,मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांमध्ये झळकलेल्या अमेयने कलाविश्वात त्यांच स्वत: स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे या लाडक्या कलाकाराची आणि त्याच्या चाहत्यांची फारशी भेट होत नाहीये. त्यामुळे या समस्येवर अमेयने एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे.

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आता युट्युबरच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‪#‎waghchaswag‬ च्या माध्यमातून अमेय युट्युबवरुन चाहत्यांशी गप्पा मारत आहे. लॉकडाउनच्या काळात तो घरी बसून काय करतोय. या दिवसांमध्ये तो कोणकोणत्या नवीन गोष्टी शिकला अशा त्याच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

अमेयचा सेन्स ऑफ ह्युमर, विनोदशैली अनेकांना आवडते. त्यामुळेच त्याच्या नव्या युट्युब चॅनेलमध्ये चाहत्यांना त्याच्याविषयी सारं काही जाणून घेता येणार आहे. क्षितिज पटवर्धन यांनी #‎waghchaswag‬ (वाघचा स्वॅग) यांच लिखाण केलं असून अमेयने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

दरम्यान, तरुणवर्गामध्ये अमेयची क्रेझ असल्यामुळे त्याच्या जीवनातील हे रंजक किस्से ऐकण्यासाठी चाहते कायम आतूर असतात. त्यामुळेच त्याने युट्युब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.