गोरेगावमधील आंबेडकर नगरमध्ये घराबाहेर उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या दोन वर्षांच्या दिव्यांश सिंह याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. ३७ तास उलटल्यानंतरही त्याचा शोध सुरुच आहे. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने तब्बल दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या घटनेनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत असतानाच अभिनेता जितेंद्र जोशीनेदेखील इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे.
“आज आषाढी एकादशी असल्यामुळे या दिवसाचं उदाहरण देत त्याने त्याचं मत मांडलं आहे. आज आषाढी असल्यामुळे आपण तुकोबांची भूमिका केलेला एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करुयात आणि आपल्यातील चतुरस्र अभिनेता म्हणजे काय ते सांगूयात. मात्र काही दिवसापूर्वीच गोरेगाव येथील झाकण नसलेल्या उघड्या गटारीत पडलेल्या आणि अद्यापही पत्ता न लागलेल्या दिव्यांश सिंगची आठवण आली. त्याच्या आई-वडीलांनीही आषाढी किंवा अन्य कोणते ना कोणते उपवास केलेच असतील ना”, असं म्हणतं जितेंद्रने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच त्याने त्याचे अन्य काही विचारही मांडले आहेत.
दरम्यान, दिव्यांश गटारात पडून वाहून गेल्यानंतर बुधवारी रात्री उशीरापासून अग्निशामक दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री साडे दहाच्या सुमारास दिव्यांश हा खेळताना घराबाहेर आला त्यानंतर परत घराकडे जाताना अंधार असल्याने तो चुकून जवळच्या उघड्या गटारात पडला. दिवसभर या भागात जोरदार पाऊस झाल्याने गटारातून पावसाचे पाणी वेगाने वाहत होते, या पाण्याच्या प्रवाहासोबत तो देखील वाहून गेला असावा, असे उपलब्ध सीसीटीव्हीमधील चित्रीकरणावरुन कळते.