प्रख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील पुतळा हटवल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतेय. याच सोशल मीडियाचा आधार घेत अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याचा संताप व्यक्त केला आहे. गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग न करण्याची भूमिका त्याने घेतली आहे.

‘मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही… मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माझ्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही! राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय? मी ह्या घटनेला निषेध करतो आणि जोपर्यन्त राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यन्त मी पुण्यात प्रयोग करणार नाही!’, असे पुष्करने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या चार संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले अशी त्यांची नावं आहेत. हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा पुतळा उद्यानातून हटविण्यात आल्यावर विविध स्तरातून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांचा अंदाज घेत राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारु अशी घोषणा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी केली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला. पहाटे समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमागे संभाजी ब्रिगेडचा हात असल्याची चर्चा आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त होत असतानाच पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कठोर पोलीस कारवाई व्हावी. मतांचे राजकारण करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीदेखील या घटनेचा निषेध दर्शवला आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणे निंदनीय असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. विनायक मेटे यांनीही या घटनेचा निषेध दर्शवला. राम गणेश गडकरी यांचे योगदान मोठे आहे. अशा पद्धतीने पुतळ्याची नासधूस करणे राज्याच्या संस्कृतीला साजेसी नाही असे त्यांनी सांगितले. राम गणेश गडकरी यांच्या लिखाणातून संभाजी महाराज यांचा अवमान झाला की नाही हा वेगळा विषय आहे. पण नाटकांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे मेटे यांनी सांगितले. मराठा समाज सर्व समाजाचे पालकत्व घेणारा समाज आहे. त्यामुळे शिवाजी किंवा संभाजी महाराजांच्या नावाने असे करणे हे त्यांना लहान केल्यासारखे आहे याकडेही मेटेंनी लक्ष वेधले. राम गणेश गडकरी यांचे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद व्याख्यान, लेखन, विचाराच्या मार्गाने करा, पुतळे फोडून नाही असे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.