मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे लवकरच ‘मिस यू मिस्टर’ या आगामी चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. हे दोघं पहिल्यांदाच एकत्र येत असल्यामुळे त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समीर जोशी यांनी घेतली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हे पोस्टर पाहून अनेकांना ना ना तऱ्हेचे प्रश्न पडले होते. चाहत्यांना पडलेले हे प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर दूर होणार आहेत. या चित्रपटामध्ये मृण्मयी आणि सिद्घार्थ व्यतिरिक्त राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समीर जोशी दिग्दर्शित आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटामध्ये हे दोघे नवं विवाहित दाम्पत्य दाखविलं असून वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते ‘लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप’ यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातून कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल.

हा संपूर्ण चित्रपट ‘लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप’ वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अशा सर्वांना हा चित्रपट खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.

दरम्यान, समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे तसेच सोनी वाहिनी वरील ‘क्राइम पेट्रोल’, सास बिना सासुरलं, आणि ‘किशनभाई खाकरेवाला’, कलर्स वाहिनी वरील ‘जीवनसाथी’ आणि झी मराठी वरील ‘भटकंती’ या सर्व मालिकेचे लेखनही केले आहे.