आयुष्यात कधी सुख असतं तर कधी दु:ख, कधी चेहऱ्यावर रडू असतं तर कधी हसू. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे ती जगण्याची पद्धत वेगळी, पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या आयुष्यात घडते ते म्हणजे पहिलं वहिल प्रेम. त्या प्रेमाचा निरागस भाव सर्वांसाठी सारखाच असतो. काळजात होणारी धडधड, नजरेच भिडणं, मनाचं जुळणं, पहिला स्पर्श, पहिलं हसू असं सगळं काही वेड लावणार असतं. अशीच एक गोष्ट आहे राधिका आणि राहुलची! ‘प्रेम पहिलं वहिलं’ चित्रपटाच्या रुपाने तरुणांनी तयार केलेली सुंदर अशी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तरुणांनी तयार केलेली प्रेमकथा मराठीमध्ये प्रथमच येत असून, या चित्रपटाच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीत नवी वाटचाल चोखळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मत चित्रपट निर्माते अन्वित कंन्सलटन्सी आणि यशश्री पिक्चर्सचे अमित हुक्केरीकर आणि मच्छिंद्र शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

पाहा फोटो अल्बम : मराठी चित्रपट ‘प्रेम पहिलं वहिलं’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटात एका नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने भेटलेल्या राधिका आणि राहुलमध्ये प्रेम फुलताना दिसतं. राहुलला राधिकाच बिनधास्त जगणं आवडू लागतं. कोणत्याही मुलीशी न बोलणारा राहुल राधिकाशी आपलेपणाने संवाद साधतो, तर राहुलच्या साधेपणात राधिकाला तिच्या मनात असलेला ‘मि. परफेक्ट’ दिसू लागतो. दरम्यान, राधिकावर बालपणापासून प्रेम करणारा तिचा मित्र यश तिच्या वाढदिवसाला भेटण्यासाठी परदेशातून येतो. राहुल राधिकाला प्रेमाची कबुली देतो का? राधिका त्याला होकार देते का ? की यश राधिकाला लग्नाबद्दल विचारतो? याचा उलगडा हा चित्रपट पाहिल्यावरच होईल. संजय शेजवळ आणि दिशा परदेशी ही चित्रपटातील प्रमुख जोडी असून, पटकथा आणि संवाद निलेश कुंजीर, संगीत पल्लव स्वरूप, पार्श्व संगीत ऐश्वर्य मालगावे यांचे आहे. ७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.