मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याला आपल्या नेहमीच्या धावण्याच्या आणि व्यायामाच्या रुटीनपासून करोनाही जास्त काळ लांब ठेवू शकला नाही असं आता दिसून येत आहे. मिलिंदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावरुन मिलिंदच्या फिटनेसचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. सोमवारी त्याने १४ दिवसांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण केला. त्याचा करोना अहवालही निगेटिव्ह आला. आज त्याने आपला पळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. १४ दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर मिलिंदने आज ५ किलोमीटर धावत आपल्या रुटीनला सुरुवात केली.

मिलिंदची पत्नी अंकिताने हा व्हिडिओ शूट केला आहे. यात तो रस्त्याच्या कडेने निळ्या रंगाचे स्पोर्ट्सवेअर घालून पळताना दिसत आहे. आपण ४० मिनिटात ५ किलोमीटर धावून पूर्ण केल्याचं त्याने सांगितलं. तसंच आपण लगेच जास्त ताण घेणार नाही, आरोग्याची पूर्ण काळजी घेत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. हे पाच किलोमीटरही आपण सहज धावून पूर्ण केल्याचं त्याने सांगितलं.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “४० मिनिटांमध्ये ५ किलोमीटर सहजपणे धावू शकलो…बरं वाटलं. पुन्हा रस्त्यावर धावून मस्त वाटत आहे. करोनानंतरच्या त्रासाबद्दल ऐकून आहे. त्यामुळे जास्त दगदग करणार नाही. फुफ्फुसाची कार्यक्षमता, रक्तातल्या गाठी आणि इतर गोष्टी ज्यांच्याबद्दल बोललं जात आहे, त्याबद्दल काळजी घेत राहीन.”

करोनाबद्दल बोलताना मिलिंदने आपल्या चाहत्यांना सांगितलं की, २५ वर्षांहूनही जास्त काळापासून त्याला कधीच फ्लूसारखी कोणतीच लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे हा करोनाच आहे याचा अंदाज आला, जेव्हा मला थकल्यासारखं वाटू लागलं, सौम्य ताप आला.
आरोग्य म्हणजे फक्त आजारांपासून सुटका नाही आणि फिटनेस म्हणजे फक्त सिक्स पॅक्स नाहीत. मन शांत आणि शरीर तंदुरुस्त ठेवायला हवं…कायम, असं म्हणत त्याने आरोग्य आणि फिटनेसचं महत्त्वही पटवून दिलं.

सोमवारी मिलिंदची करोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्याा विलगीकरणाचा कालावधीही संपला. त्यानंतर त्याने आपली पत्नी अंकिता कोनवर हिच्यासोबत वेळ घालवला. दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याने आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली. त्याने शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल आपल्या चाहत्यांचे आभारही मानले.