भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. क्रिकेट प्रेमींच्या लाडक्या ‘कॅप्टन कूल’चा प्रवास नक्कीच पाहण्यासारखा होता. ‘एमएस धोनी..’ हा २०१६ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता. छोट्या पडद्यावरचा अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या करिअरलाही या चित्रपटानं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. धोनची भूमिका साकारलेला सुशांत सगळ्यांच्याच लक्षात राहिला. वर्ल्ड कप सामन्यापर्यंत धोनीचं आयुष्य या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. मात्र आता धोनीची सेकंड इनिंग रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

वर्ल्ड कपनंतरचं धोनीचं आयुष्य, आयपीएल सामन्यात चेन्नई संघाचा विजय, धोनीच्या खेळावर उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मिड डेच्या माहितीनुसार रोनी स्क्रूवाला या चित्रपटाचे निर्माते असू शकतात. सिक्वलमध्ये देखील सुशांत सिंग राजपुत पाहायला मिळणार आहे. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज पांडेनं केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं २०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. तेव्हा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चा सिक्वल २०१९ पर्यंत येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.