छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरत असलेला ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातील प्रत्येक भागामध्ये नवनवीन पाहुणे भेट देत असतात. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या मंच्यावर अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून काही दिवसापूर्वी ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमही आली होती. यावेळी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी आणि संजय राऊत हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्येच नवाजुद्दीनने करिअर घडवितांनाच्या त्याच्या काही आठवणींनाही उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास ‘ठाकरे’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीनने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे.

चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनला या कार्यक्रमादरम्यान मनोरंजन क्षेत्रामध्ये तब्बल १२ वर्ष स्ट्रगल करताना कोणत्या अडचणी आल्या असा प्रश्न मकरंद अनासपुरे यांनी विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने करिअर घडवत असताना कराव्या लागलेल्या खडतर प्रवासाचं कथन केलं.

‘वॉचमन ते अभिनेता हा प्रवास करताना अनेक अडचण आल्या.१२ वर्ष स्ट्रगल करताना एक वेळ अशी आली होती की, आता सगळं संपलं असं वाटलं होतं’, असं नावाजुद्दीन म्हणाला. तसंच त्यांना दिवंगत अभिनेता दादा कोंडके आवडत असल्याचंही त्याने सांगितलं.

दरम्यान, नवाजुद्दीनने या कार्यक्रमामध्ये करिअरविषयी , चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणेच संजय राऊत यांनीदेखील त्यांनी त्यांचे राजकारणातील अनुभवांचं कथन केलं आहे. हे अनुभव आणि नवाजुद्दीनच्या संघर्षाविषयी जाणून घेण्यासाठी २५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वा. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा धमाकेदार भाग नक्की पाहा.