‘नक्सलबाडी’ ही वेब सीरीज नुकतीच प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन आणि पटकथा या गोष्टींचं विशेष कौतुक केलं जातंय. अत्यंत स्फोटक अशा विषयाला समंजसपणे हाताळल्याबद्दल समीक्षकांनी कौतुक केलं आहे. या सीरिजला आतापर्यंत ५० दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे.

झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. ‘जीसिम्स’ म्हणजेज ‘ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. ‘समांतर’ ही मराठी वेब सीरीज सुपरहिट ठरल्यानंतर या कंपनीने ‘नक्सलबाडी’ची निर्मिती केली आहे.

अनलॉकदरम्यान सरकारने अटीशर्तींसह चित्रीकरणाची परवानगी दिल्यानंतर या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. या सीरिजचे संपूर्ण चित्रीकरण गोवा येथे करण्यात आले आहे. या सीरिजचे दिग्दर्शन पार्थो मित्रा यांनी केलं असून राजीव खंडेलवालची यात मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच टीना दत्ता, शक्ती आनंद, आमिर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पार्थो यांनी ‘बडे अच्छे लगते है’, ‘कसम से’ आणि ‘इतना करो ना मुझे प्यार’ यांसारख्या मालिकांचं तर ‘कोई आप सा’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.