रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळेच त्यांच्यावर आधारित ‘हरि ओम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटातील कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. त्यामुळे या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.

‘हरि ओम’ या चित्रपटाचं एक नवीन पोस्टर प्रदर्शित झालं असून चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. या चित्रपटात हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून ते कलाविश्वात पदार्पण करणार आहेत.

हरिओम घाडगे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली असून, ते या चित्रपटात मोठ्या भावाची म्हणजेच हरीची भूमिका साकारणार आहेत. तर ओमची भूमिका गौरव कदम साकारणार आहे.  चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी दोन्ही कलाकारांनी तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांच्या डाएटवर, व्यायामावरही लक्ष केंद्रित केलं.

दरम्यान, आशिष नेवाळकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती हरिओम घाडगे यांनी केली असून हा कौटुंबिक चित्रपट आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या कथेविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत.