09 August 2020

News Flash

BLOG : जुने गाणे, नवीन बांधणी…..

'जुन्या गाण्यांची नवीन मांडणी/बांधणी ही संस्कृती वेगाने रुजत गेली

दिलीप ठाकूर

अगदी नेमके सांगायचे तर, जुने गाणे नवीन ढंगात याची पाळेमुळे दोन तीन जुन्या गोष्टीत आहेत. आणि तिच आज फोफावलीत. एक म्हणजे, वाद्यवृंद अर्थात ऑर्केस्ट्रा ( खरं तर सुपर हिट चित्रपट गीतांना अशा मनोरंजनात भारी स्थान आणि त्यात प्रती लता मंगेशकर/मोहम्मद रफी/किशोरकुमार इतर मान्यवर गायक बरेच. पण त्यातूनच एखादा कुमार शानू आला), कॉलेज डेचा रेकॉर्ड डान्स ( पुन्हा तेच सुपरहिट गाण्यावर नाचो संस्कृती. कित्येक स्टार आपण कधी काळी अशा रेकॉर्ड डान्सवर श्रीदेवीच्या गाण्यावर नाचून बक्षीस मिळवलयं असे सांगतात).

ऐंशीच्या दशकात व्हिडीओ अल्बमचे एकीकडे पीक आले ( जुन्या हिट गाण्यांचा गाण्यांच्या चाली आणि मुखड्यावर नृत्य), आता बडे स्टार आपल्याच गाण्यांवर अनेक देशांमध्ये स्टेज शो करु लागले ( अमिताभ बच्चनने एकही देश सोडला नाही असेही थट्टेत म्हटले जाऊ लागले. ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है..’ त्याचे फेव्हरेट होते. त्याचा शेवट करताना जयाला तो उचलून घेतो), याच काळात काही कॅसेट कंपन्यानी जुनी हिट गाणी नवीन आवाजात अशा कॅसेट्स निर्मितीचे अफाट पीक आणले. अवघ्या पंधरा रुपयात मिळणारी कॅसेट रिक्षा/ट्रक/बार/क्लब यातून भरपूर चालली. याकडे आपण जबरदस्त संगीत प्रसार या दृष्टीनेही पाहू शकतो. आता आवाज कोणाचा आहे, यापेक्षा गाणे ओळखीचे अथवा हिट आहे ना याला महत्व होते. चित्रपट संगीताचे अभ्यासक आणि विश्लेषक यावर नाराज होते, खुद्द लता मंगेशकर यांनी या ‘संगीत सुकाळा’बाबत नाराजी व्यक्त केली. पण नव्वदच्या दशकात हे सगळे जोरात चालले. अशातच आशा भोसले यांचा ‘तिसरी मंझिल ‘मधील ‘ओ मेरे सोना रे सोना रे… ‘वगैरे गाणी नव्याने गायलेला आणि त्यावर सोनाली बेंद्रेने ग्लॅमरस लूकमध्ये दर्शन घडवलेला व्हिडीओ अल्बम आला. तो सुपर हिट झाला.

अशा विविध प्रकारे आणि स्तरावर ‘जुन्या गाण्यांची नवीन मांडणी/बांधणी ही संस्कृती ( आणि वस्तुस्थिती) वेगाने रुजत गेली. दरम्यान, राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘कयामत ‘ ( १९८३) मध्ये एका पार्टीच्या दृश्यात स्मिता पाटीलला गाणे गाण्याची फर्माईश होते. हिंदी चित्रपटात असे प्रसंग आणि गाणी बरीच. त्यामुळे एका नवीन गाण्याचा जन्म होतो. पण राज एन. सिप्पीने ते टाळले आणि दिग्दर्शक विजय आनंदच्या परवानगीने ‘गाईड ‘( १९६५) मधील वहिदा रहेमानवरचे ‘कांटो के खीच के ये आंचल…’ हे गाणे स्मिता पाटील गातेय असे दाखवले. येथे दिग्दर्शक दिसतो असेही हवं तर म्हणू.

मात्र, गेल्या काही वर्षात याच कल्चरचे स्वरूप बदलले. त्याने वेगाने अक्राळविक्राळ रूप धारण केलेय. ‘इन्कार ‘( १९७६) मधील हेलनच्या अतिशय उत्तम नृत्याने खुललेले ‘मुंगडा मुंगडा…’ आता ‘टोटल धमाल ‘मध्ये आले. यात ते कोणी साकारलंय हे जाणून घ्यायची गरज नाही असाच तब्बल चाळीस वर्षांनंतरही ‘मुंगडा ओ मुंगडा’ म्हटलं की हेलन आणि मग त्याच दारुच्या अड्ड्यावरचा अमजद खान, गुरुबचन सिंग डोळ्यासमोर येतात. तोच प्रकार ‘तेजाब ‘( १९८८)च्या ‘एक दो तीन चार’ गाण्याचा. त्याचेही नवे रुप आले आणि गेलेही. ते कोणत्या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसवर होते ते आठवणार नाही. पण ‘एक दो तीन चार’ म्हटलं की माधुरी दीक्षितच्याच बेहतरीन नृत्य अदा डोळ्यासमोर येतात. दिग्दर्शक एन. चंद्रांमुळे मेहबूब स्टुडिओत या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस मला प्रत्यक्ष हजर राहून माधुरी दीक्षितची अथक मेहनत दिसली. म्हणूनच ही जुनी गाणी प्रसार माध्यमे बदलली, वाढली तरी आपला मूळ इम्पॅक्टही कायम ठेवून आहेत. मध्यंतरी जावेद अख्तरनी याबाबत कॉपी राईटचा मुद्दा उपस्थित केला. पण या जुन्या गाण्याचे हक्क कॅसेट कंपनीकडे असतात आणि ते आपल्या अधिकारात नवीन चित्रपटासाठी देतात. अर्थात जुने ते सोने असल्याने त्याची किंमतही चांगलीच मिळत असेल. आणि आज चित्रपट निर्मिती म्हणजे ध्यास, सामाजिक सजगता, प्रबोधन वगैरे जवळपास नाही, आज व्यावसायिक यश महत्वाचे झालेय. चित्रपटगृहात प्रेक्षक नसले तरी अनेक कोटी कमावल्याच्या बातम्या येतात. तात्पर्य, जुन्या गाण्यांचा बदलता प्रवास व्यावहारिक पातळीवर घट्ट बांधला गेला आहे. म्हणूनच जुन्या चित्रपटाचे दिग्दर्शकही फार काही तक्रार करत नसावेत. मनोरंजन चॅनलच्या गेम शो, रियॅलिटी शोमधूनही जुन्या आणि मधल्या काळातील गाण्यांचा प्रवास सुरू आहे. तो मराठीत येणे स्वाभाविक आणि अपेक्षित होते. ‘… आणि काशिनाथ घाणेकर ‘मध्ये ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ ( पिंजरा), ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?’ ( हा खेळ सावल्यांचा) या हिट गाण्यांचा एकेक अंतरा आला. विशेष म्हणजे या गाण्यातील अमृता खानविलकर , प्राजक्ता माळी यांना सोशल मिडियात भरपूर लाईक्स मिळाल्या. आजच्या डिजिटल पिढीला हे जुन्या गाण्यांचे नवीन रुपडं आवडलं. ‘पिंजरा ‘च्या मूळ गाण्यातील डाॅ. श्रीराम लागू यांची अस्वस्थता आणि संध्याजींची लकब बेहतरीन हे मागची पिढी कायमच आठवणीत जात सांगते. आता हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा २’मध्ये सतीश कुलकर्णी निर्मित ‘गंमत जंमत ‘( १९८७) मधले अश्विनी तू ये ना…. हे सदाबहार गाणे नवीन रंगढंगात आहे. हे गाणे मेहबूब स्टुडिओत रेकाॅर्ड झाले तेव्हा मी घेतलेला अनुभव नवीन गाण्याच्या लाॅन्चच्या वेळी सांगताना सचिन पिळगावकरचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सूर होता. किशोरकुमारने या गाण्यासाठी कसा होकार दिला हे सचिनने खुलवून सांगितले. विशेष म्हणजे, सचिन आणि अशोक सराफने नवीन स्वरूपातील ‘अश्विनी तू ये ना…’ गाण्याचे स्वागत केले. मूळ गाण्याच्या चित्रपटाचा दिग्दर्शकच ( तसेच या गाण्याचे खुद्द सचिननेच नृत्य दिग्दर्शन केले) या गोष्टीचे स्वागत वा कौतुक करतोय. हे जास्त महत्वाचे आहे. असो.

आजच्या डिजिटल पिढीला अशी जुन्या गाण्याची नवीन केमिस्ट्री आवडतेय हे लक्षणीय आहे. फार पूर्वी रेडिओ आणि ग्रामोफोन याच माध्यमातून रसिकांसमोर गाणे जाई, आज यू ट्यूब चॅनलचे माध्यम आहे. पूर्वीच्या जीवनशैलीनुसार गाणी असत, आज गतिमान काळात गाण्याच्या आस्वादापेक्षा टेम्पररी आनंद महत्वाचा वाटतोय. प्रवासात थोडा टाईमपास हवा म्हणून गाणी ऐकणारे खूपच. तेथे हे जुन्या गाण्यांची नवीन मांडणी कल्चर फिट बसलेय. पण त्याचे चित्रीकरणही पूर्वीसारखे ढासू होऊदेत ( खास करुन हिंदी चित्रपटात) अशी अपेक्षा ठेवणे अजिबात चूक नाही.

जुन्या गाण्यांचा नव्याने वापर यात अगदी वेगळे उदाहरण म्हणजे, संगीतकार राहुल देव बर्मनना श्रध्दांजली म्हणून त्यांच्या काही गाण्यांना नव्याने रेकाॅर्डिंग करीत ‘दिल बिल प्यार ब्यार ‘ ( २००२) नावाचा चित्रपट आला. पटकथेच्या ओघात ती गाणी होती. पण या चित्रपटाचे शीर्षक असलेल्या गाण्याला मात्र ( चित्रपट शागीर्द) लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. अशाही काही गंमती जंमती घडतात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 11:22 am

Web Title: old song recreation blog ssj 93
Next Stories
1 Remembering Rajesh Khanna: राजेश खन्नांना होते ज्योतिषविद्येचे ज्ञान अन् पाककलेची आवड
2 राहुल महाजनला ‘या’ अभिनेत्रीने लगावली कानशिलात, कारण…
3 म्हातारपणी अशी दिसेल सोनाली कुलकर्णी
Just Now!
X