01 March 2021

News Flash

Oscars 2017: देव पटेलची ‘मेरे पास माँ है’ मोमेंट

सोशल मीडियावरही देवच्या ऑस्कर डेटचीच चर्चा

छाया सौजन्य- ट्विटर

भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याने २००८ या वर्षी पहिल्यांदाच ऑस्करच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत अनेकांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर दिवसागणिक देवच्या चाहत्यांचा आकडा वाढतच गेला ही बाब नाकारता येणार नाही. त्यात यंदाच्या म्हणजेच २०१७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी देवला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या विभागामध्ये नामांकन मिळाल्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा आहे असेच म्हणावे लागेल. नुकत्याच पार पडलेल्या अॅकॅडमी पुरस्कार अर्थात ऑस्कर सोहळ्यात महेर्शाला अली या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि देवला ऑस्करने हुलकावणी दिली. असे असले तरीही देवच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळेच सांगत होता.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध कलाकार त्यांच्या ऑस्कर डेटसह येतात. त्यातच देवची ऑस्कर डेट काही खास होती. अभिनेता देव पटेल त्याच्या आईसह ऑस्करच्या रेड कार्पेटवर आला होता. आई आणि मुलाच्या या जोडीने प्रसारमाध्यमं आणि तिथे उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले. सोशल मीडियावरही देवच्या या ऑस्कर डेटचीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. देव पटेलचा सहभाग असलेल्या ‘लायन’ या चित्रपटाला कोणताही पुरस्कार जिंकता आला नसला तरीही देव पटेलने मात्र अनेकांचीच मने जिंकली आहेत. आपल्या आईसोबत देव पटेल ऑस्करच्या रेड कार्पेटवर आला आणि प्रसारमाध्यमं, छायाचित्रकार आणि इतर सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. यावेळी देवच्या आईच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि आनंद पाहण्याजोगा होता. अनेकांनी देवच्या आईचे उत्साहात स्वागत केले. त्यामुळे ग्लॅमर, चित्रपटाला पुरस्कार मिळण्यासाठीची चढाओढ, सर्वात चांगली वेशभूषा परिधान करणारे सेलिब्रिटी आणि भरपूर गॉसिपची चंगळ असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये आई-मुलाच्या या अनोख्या जोडीने एक वेगळाच पायंडा घातला आहे असेही म्हटले जात आहे.

Next Stories
1 महेर्शाला अलीच्या ऑस्कर विजयाने पाकिस्तानमध्ये वाद
2 आलियाच्या तालावर नाचणाऱ्या या अवलियाला ओळखलंत का?
3 देदीप्यमान इतिहास असणाऱ्या देशाचा वर्तमान केविलवाणा कसा?
Just Now!
X