यजमान इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेता ठरला. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. यावरून क्रिकेट जाणकारांनी आणि चाहत्यांनी ICC च्या नियमावलीवर टीकेची झोड उठवली. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनीदेखील या नियमांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘धोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला,’ असं ट्विट करत परेश रावल यांनी ICC ला टॅग केलं आहे. हिटमॅन रोहित शर्मानेही ICC च्या नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली. रोहितशिवाय माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, युवराज सिंग जाणीव गौतम गंभीर यांनीही या नियमांवर प्रश्न उपस्थित केले.

आणखी वाचा : ‘वर्ल्ड कप’ खेळायला गेला होतात की हनिमूनला? विराट व रोहितला राखी सावंतचा सवाल

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.