शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या चित्रपटातील टीझरमध्ये शाहरुखच्या हातात कृपाण दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाच्या भावाना दुखवाल्या गेल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील टीझरमधून वरील दृश्य वगळण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग यांनी याचिका दाखल केली आहे.

शाहरुख आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुद्दामहून चित्रपटात कृपाणचं दृश्य दाखवलं आहे. केवळ प्रसिद्धीसाठी याचा वापर करण्यात आला आहे. मात्र प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात विशिष्ठ समाजाच्या भावना आपण दुखावल्या आहेत याचं भान दोघांना नाही. त्यामुळे चित्रपटातून हे दृश्य वगळावं अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. कृपाण अशा पद्धतीनं दाखवणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी पंजाबमधील अकाली दलाचे आमदार मंजिंदर सिंग सिरसा यांनी पंजाबमधील कोर्टात शाहरुख खान आणि इतरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटात शीख समाजावर कोटी करण्यात आल्याचा सिंग यांचा आरोप होता. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणूनच या सिनेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.