मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयांवर सडकून विरोध करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी नोटबंदीवर आपले मत मांडले आहे. केंद्र सरकारने त्यांची ही सर्वात मोठी चूक होती असे मान्य करुन जनतेची माफी मागावी, अशी राज यांनी मागणी केली आहे. प्रकाश यांनी ट्विट करत आपले परखड मत मांडले. त्यामुळे त्यांच्या या ट्विटवरुन पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता व्यक्त आहे.

राज यांनी लिहिले की, ‘जिथे श्रीमंतांना त्यांचा काळा पैसा नवीन नोटांमध्ये बदलण्याची एक संधी मिळाली. पण लाखो लोकांच्या जीवनावर याचा विपरित परिणाम झाला, ते अधिक लाचार झाले. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तुम्ही केलेल्या या चुकांबद्दल माफी मागितली पाहिजे.’

८ नोव्हेंबर, २०१६ मध्ये पंतप्रधान नंरेंद्र मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी आणली होती. या बंदीचे स्पष्टीकरण देताना त्यांनी काळ्या पैशावर रोख लावण्यासाठी उचलले गेलेले हे पाऊल असल्याचे म्हटले होते. यापूर्वीही प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. ‘मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते असून, माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत,’ असे त्यांनी म्हटले होते.

‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही. मात्र, सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत: फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश?,’ असे प्रकाश राज म्हणाले होते.