गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. या घटनेनंतर अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

प्रसाद ओकने त्याचा स्वत:चा राज ठाकरे यांच्या अंदाजातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून हुबेहूब राजच अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. या फोटोची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्याला दिलेला कॅप्शन. ‘Thinking About EDitos’ असं कॅप्शन प्रसादने या फोटोला असून ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर त्यावर मारलेला टोमणा समजलं जात आहे. सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्राजक्ता माळी यांसारख्या कलाकारांनी या पोस्टला लाइक केलं आहे. ‘वा वा.. अतिशय मार्मिक’ अशी कमेंट प्राजक्ता माळीने या पोस्टवर दिली आहे. तर सोनाली कुलकर्णीनेही उपरोधिक हसल्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/B1fynQqgU_F/

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं होतं. नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी पूर्ण सहकार्य केलं अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा बोलवण्यात येईल असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.